म्हादई प्रश्न पक्षीय पातळीवर सोडवणार : भाजप
पणजी :
म्हादईच्या कळसा व भांडुरा प्रकल्पाच्या कर्नाटकाने सादर केलेल्या नव्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या मान्यतेनंतर राज्यात म्हादई पाणी वळविण्यावरून जनजागृती सुरू झाली. विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींनी चळवळ उभी केली असून, त्याला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या चळवळीला आणखीच बळ मिळाले आहे. म्हादईचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पक्षीय पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
भाजपचे यापूर्वी एक शिष्टमंडळ दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलस्रोत मंत्र्यांना भेटून आले आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व इतर मोजक्याच मंत्र्यांना घेऊन आपण पुन्हा दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत. त्यामुळे भाजप हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या सरकारी पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे, असे म्हणावे लागेल.
दरम्यान, साखळी शहरातील सभेला दिलेली परवानगी दबावामुळे पालिकेने मागे घेतल्यानंतर ‘सेव्ह म्हादई’साठी 16 रोजी आयोजित केलेली सभा त्याच मतदारसंघात विर्डी येथे होणार आहे. जर मुख्यमंत्र्यांना म्हादई आपली आई वाटत असेल, तर त्यांनी या सभेला यावे. ही कोणत्याही पक्षाची सभा नव्हे, तर गोव्याची जीवनदायिनी म्हादईला वाचविण्याची चळवळ आहे. सर्व आमदारांनी सभेला उपस्थित राहून लढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन सहा पक्षप्रमुखांनी शनिवारी आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत केले.