”त्या’ दुचाकी चालकांवर कारवाई करणार का?’
पणजी :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गोव्याचे पोलीस महासंचालक दखल घेऊन सर्व उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीयो जारी करुन, काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाने भाजपवर लोकांचे जीव धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे. भाजप सरकारसाठी केवळ कार्यक्रम व प्रसिद्धी महत्वाची असून, लोकांचे जीव गौण आहेत का? असा रोकडा सवाल देखील त्यांनी केला आहे.
केरी समुद्रात बुडून चार निष्पाप जीव गेले. तरीही असंवेदनशील भाजप सरकारने सर्व नितीमुल्ये पायदळी ठेवत अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस साजरा केला. इतरांना प्रवचन देणारे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतील का? असा सवाल दिव्या कुमार यांनी करुन त्यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उल्लंघनाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
एरवी भाजपचे तुणतूणे वाजविणारे लाउडस्पीकर कुठे आहेत? लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजपच्या या मुर्खपणावर भाजपचे प्रवक्ते रुपेश कामत, सिद्धार्थ कुंकळ्ळीकर, गिरीराज पै वेर्णेकर, शर्मद रायतूरकर, दत्तप्रसाद नाईक, साव्हियो रॉड्रिग्स आता तोंड उघडतील का? असा सवाल समाजमाध्यम संयोजक सोहन शेणई यांनी केला.
हेल्मेट न घालता दुचाकीस्वारांना नियम तोडण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खंत वाटायला पाहीजे. ही मिरवणूक भाजपची असंवेदनशीलता उघड करते. भाजपते लक्ष केवळ कार्यक्रम आणि उत्सवांवर केंद्रित आहे असे सांगून कॉंग्रेसचे युवा नेते रोहन नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांना प्रश्न केले आहेत.