नव्या झुआरी पुलाचे थाटात उद्घाटन
पत्रादेवी-पाळोळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पत्रादेवी-दोडामार्ग-केरी-मोले-पाळोळे अशा बायपासला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जमीन अधिग्रहण करण्यासाठीचे 50 टक्के पैसे आणि स्टील, सिमेंटवरचा जीएसटी खर्च राज्य सरकार भरण्यास तयार असल्यास या पुलाच्या अंतिम सर्वेक्षणानंतर मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित असलेल्या झुआरी केबलस्टेड पुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भव्य आतषबाजीत लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गडकरी यांच्यामुळेच हा प्रकल्प साकार होऊ शकला. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत आहे. अटलसेतू उद्घाटनावेळी त्यांनी ‘हाउ ज द जोश’ असे विचारले होते. ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत आहोत.
गेल्या 30 वर्षांत वाहतुकीसंबंधी दक्षिण गोव्यातील सर्वांनी जो त्रास भोगला तो यापुढे होऊ नये. मनोहर विमानतळ कार्गो विमानतळ असल्याने दक्षिण गोव्यातील माल आणण्यासाठी या पुलाचा फायदा होईल. याशिवाय मुरगाव बंदरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी फायदा होईल.
यावेळी श्रीपाद नाईक, नीलेश काब्राल यांची भाषणे झाली. यावेळी राज्यातील खड्ड्यांच्या संबंधित सूचना आणि इतर माहिती मिळविणाऱ्या ॲपचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले.
2,530 कोटींच्या भव्य प्रकल्पातील मुख्य टॉवरवर रिव्हॅलविंग रेस्टॉरंट आणि व्हीविंग गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी यापूर्वी दोनदा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी आता केंद्र व राज्य सरकार काही पैशांची गुंतवणूक करून हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.
देशातील सर्वात उत्तम लाईट अँड साऊंड शो जर कुठे असेल तर तो नितीन गडकरीजींच्या नागपुरात आहे. मी तो शो पाहिला आहे. तितका चांगला नसला तरी चालेल पण, गडकरीजी या नवीन झुआरी पुलावरदेखील लाईट अँड साऊंड शो करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अशा पद्धतीच्या म्युझिक आणि लाईट शोचा पर्यटनासाठी आम्हाला खूप फायदा होईल, सर्व गोयंकरांच्यावतीने मी ही विनंती करत आहे, असे मुख्यमंत्री सावंत गडकरींना म्हणाले.