गोंयकार हे सच्चे गांधीवादी आहेत, गोडसेप्रेमी नाही : अमित पाटकर
पणजी :
गोमंतकीयांनी नेहमीच सर्व धर्मांचा आदर करून जातीय सलोखा पाळला आहे. जत्रा, फेस्त आणि ईद उत्सवात सर्व धर्मातील गोमंतकीय सहभागी होतात. गोमंतकीय गोडसेच्या नव्हे तर महात्मा गांधींच्या विचारसरणीचे पालन करतात याचा मला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
हे अत्यंत दुर्दैवी आहे की काही समाजकंटक सत्तेत असलेल्या पक्षाच्या पाठबळाच्या जोरावर गोव्यात जातीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहखात्याचा ताबा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काणकोण आणि कुंकळ्ळी येथील घटनांबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहेत, ही धक्कादायक बाब आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क राहायला हवे. संकटकाळी आपण सर्वांनी एकामेकाना साथ दिली पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.
महात्मा गांधी यांच्या दुर्दैवी मृत्यूला ७६ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांनी अहिंसेची शिकवण दिल्याने जग त्यांचे आजही स्मरण करत आहे. आपण हिंसाचाराला बळी पडू नये, असे प्रतिपादन अमित पाटकर यांनी केले.
आपण पृथ्वी मातेची लेकरे आहोत आणि जंगल, नद्या, शेती, डोंगर, पर्वत यांचे रक्षण करून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. गोव्यात जमिनींचे रुपांतरण करून पृथ्वी मातेच्या होत असलेल्या विनाशावरून लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
मी सर्व धर्मांतील गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो की, फुटीरतावादी आणि असामाजिक घटकांकडून भडकवीण्याचा प्रयत्न हाणून पाडा. आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.