’सरकार इव्हेंटमध्ये बुडाले; नागरिकांच्या सुरक्षेवरील लक्ष उडाले’
फोंडा येथे पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने गोव्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनूसार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या केवळ इव्हेंटवर खर्च करण्याच्या ध्यासामुळे गोमंतकीयांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
बेतोडा जंक्शन येथे अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेत्यांनी गोव्याला गुन्हेगारी स्थळात रूपांतरित केल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
गोव्यात ‘गोडसे’च्या अनुयायांचे ‘रावणराज्य’ चालू आहे. गुन्हेगारी, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, भिकारी, जमीन बळकावणारे माफिया यांना प्रोत्साहन भाजप सरकार देत आहे. गोमंतकीय दररोज एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या बातमी ऐकतच जागे होतात, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे कायद्याची अंमलबजावणी करणारी संपूर्ण यंत्रणाच डबघाईला आल्याने गुन्हेगारांच्या मनात अजिबात भीती नाही. गोव्यात भाजपच्या आशीर्वादाने माफिया कार्यरत आहेत, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
मीरामार येथे एका अर्भकाला कसे सोडून दिले आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्यामुळे सदर महिलेचा माग काढण्यात पोलिस हतबल झाले हे आपण काही महिन्यांपूर्वी पाहिले होते. पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याची घटना समोर आली आहे. भाजप सरकार मागील घटनांवरुन धडा घेत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
मी या घटनेचा सखोल आणि निःपक्षपाती तपास करण्याचा तसेच घटनास्थळी कार्यरत नसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत सविस्तर अहवाल जारी करण्याची सरकारकडे मागणी करतो. जे सरकार नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यात अपयशी ठरते त्यांना शासन करण्याचा अधिकार नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.