राज्याने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. स्पर्धेचे आयोजन सफल ठरले. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची क्षमता गोव्यापाशी असल्याचा विश्वास क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केला.
क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘पायाभूत सुविधा आणि संघटन याबाबतीत राज्यातील क्रीडा क्षेत्र सज्ज आहे. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन यशस्वी ठरले आहे. त्यामुळे आता कोणतीही क्रीडा स्पर्धा घेण्याची सज्जता गोव्याने प्राप्त केली आहे. आम्ही कोणतेही नवे आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहोत. आमच्या कौशल्यपूर्ण नियोजनाचा हा परिणाम आहे.’’
गोवा राज्य पर्यटनासाठी ओळखले जाते. या राज्यात संपन्न संस्कृती आहे. त्यामुळे क्रीडा, पर्यटन आणि संस्कृती यांना बळकटी मिळायला हवी आणि त्यांची सांगड घालण्याची गरज क्रीडामंत्री गावडे यांनी प्रतिपादली.
37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता राज्यात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे प्रस्ताव आहेत. विविध खेळांचे महासंघ गोव्यात स्पर्धा घेण्यासाठी इच्छुक असल्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले. गोव्यात सेपॅक टॅक्रो खेळातील विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे, तसेच मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा घेण्याचा प्रस्तावही असल्याची माहिती त्यांनी दिली.
क्रीडा क्षेत्रात युवा गुणवत्ता शोधण्याची आवश्यकता क्रीडामंत्री गावडे यांनी प्रतिपादली. ‘‘गुणवत्ता हुडकण्यासाठी आम्हाला गावात जावे लागेल. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे राज्यातील कौशल्यास व्यापसीठ मिळाले. हाच स्पर्धा आयोजनाचा मुख्य हेतू होता. लहान वयात मुलांतील सुप्त क्रीडागुण शोधण्यावर आमचा भर राहील. गोमंतकीय क्रीडापटू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत हेच ध्येय आहे,’’ असे ते म्हणाले.
“यशस्वी स्पर्धा आयोजनाचे सारे श्रेय मला एकट्याला जात नाही, हे सांघिक काम आहे, नियोजन महत्त्वाचे ठरले. गेले सात महिने आम्ही आव्हाने आणि अडसर यांना तोंड देत हे कठीण काम पार पाडले आहे. तीन महिन्यांपासून आम्ही झोपेविना रात्री घालविल्या आहेत, रात्री दोन वाजेपर्यंत बैठका घेतल्या. आम्ही उच्च ध्येयाकडे पाहिले, आम्हाला आमची क्षमता प्रदर्शित करायची होती,” असे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.