राज्यात पुराचा धोका कायम
गोव्यात जूनचा अखेर काहीसा कोरडा गेला असला तरी जुलैची सुरुवात मात्र पावसाने दमदार झाली आहे. गेले चार ते पाच दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने गोमंतकीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सर्वच भागात पावसाच्या मुसळधार हजेरीमूळे काही ठीकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. तसेच रस्ते ही पाण्याखाली जात आहेत.
आजच्या स्थितीला राज्यात पाऊस कायम असल्याने अनेक ठीकाणी शेतीची कामे थांबली आहेत. तसेच वाहतुक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुक ही विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे.
वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसळधार कायम राहण्याचा अंदाज खरा ठरल्यास राज्यातील परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पावसामूळे राजधानी पणजीसह राज्यातील सर्वच शहरांतील बहूतेक अंतर्गत आणि मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याच चित्र आहे. त्यामुळे मुख्य शहरांत वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. यामूळे छोटे-मोठे अपघातही घडू लागले आहेत. काही गावांचा एकमेकांपासून संपर्क तुटला आहे.
सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील सर्व नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने साखळीत दुपारीच पंपिंगचे काम सुरु करण्यात आले होते. पुढील काही दिवस पाऊस कायम राहिल्यास गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाही बार्देशातील नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजधानी पणजीतील पाटो परिसरातील सर्वच रस्ते पाण्याखाली राहिले. त्यामुळे या परिसरातील कार्यालये, आस्थापनांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी घरी परतताना अनेक संकटाचा सामना करावा लागला.