IFFI 53 : आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपट
नवी दिल्ली:
20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी चुरस आहे. चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या, कला आणि राजकारण अशा बहुसंख्य प्रचलित विषयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
इफ्फीच्या तिसर्या आवृत्तीपासून सुरु झालेल्या पहिल्या सुवर्णमयुर पुरस्कारापासून आजपर्यंत हा पुरस्कार आशियातील सर्वाधिक प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. या वर्षी देखील विजेते निवडण्याचं अशक्यप्राय काम सोपवलेल्या ज्युरींमध्ये इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि आपल्या भारतातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी :
1. परफेक्ट नंबर (2022)
पोलंडचे चित्रपट निर्माते क्रिस्झटॉफ झानुसी यांचा परफेक्ट नंबर हा चित्रपट नैतिकता आणि मृत्यूबद्दलच्या विचारांना नाट्यमय पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणतो. इटली आणि इस्रायल यांची सह-निर्मिती असलेला , हा चित्रपट एक तरुण गणितज्ञ आणि त्याचा दूरचा चुलत भाऊ यांच्यातील नातेसंबंध अधोरेखित करतो आणि त्या दोघांमधील भेटीमुळे जगातील रहस्यमय वास्तव, जीवनाचा अर्थ आणि जीवन व्यतीत होण्याचा प्रवास यावर भाष्य करतो.
2. रेड शूज (2022)
मेक्सिकन चित्रपट निर्माता कार्लोस आयचेलमन कैसरने त्याच्या रेड शूज या चित्रपटाचे वर्णन इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा एक भावनिक प्रतिबिंब म्हणून केले आहे. ही कथा एका शेतकऱ्याची आहे जो त्याच्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर एकाकी जीवन जगत असतो. हा शेतकरी एका अपरिचित आणि परक्या जगात प्रवेश करून त्याच्या मुलीचा मृतदेह घरी आणण्याचा प्रयत्न करत असताना चित्रपटाची कथा पुढे सरकते. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं असून व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रेक्षक पुरस्कारासाठी मिळालेलं नामांकन विशेष चर्चेत होतं.
3. ए मायनर (2022)
1970 च्या दशकातील इराणी चित्रपटांमधील नवीन युगाच्या संस्थापकांपैकी एक दारियुश मेहरजुई हे इराणी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आणि प्रसिद्ध आहेत. ए मायनर या त्यांच्या नवीन चित्रपटासह ही हस्ती इफ्फीमध्ये परतली आहे. ही कहाणी एका मुलीची आहे जिला वडिलांचा विरोध असूनदेखील संगीतकार होण्याची इच्छा आहे, एकाच कुटुंबातील सदस्यांमधील गुंतागुंतीची समीकरणे, पालक आणि मुले यांच्यातील भिन्न आकांक्षा आणि संगीताची संमोहित करणारी जादू अशी या चित्रपटाची संकल्पना आहे.
4. नो एन्ड (2021)
इराणी चित्रपट , नो एन्ड इराणमधील गुप्त पोलिसांच्या हेराफेरी आणि कारस्थानांचे चित्रण करतो. एक शांत आणि सचोटीने वागणारा माणूस आपले घर वाचवण्यासाठी खोटे बोलून गुप्त पोलिस असल्याचा बनाव करतो. मात्र जेव्हा प्रत्यक्षातील गुप्त पोलिस या नाट्यात प्रवेश करतात तेव्हा गोष्टी क्लिष्ट होतात.
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाफर पनाही आणि त्यांचे सहयोगी नादेर सायवर यांनी एकत्रितपणे केलेलया या दुसऱ्या चित्रपटाला न्यू करंट्स पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. जाफर पनाही यांनी या चित्रपटासाठी सल्लागार आणि संकलक म्हणून कार्य केले आहे.
5. मेडिटेरेरियन फीव्हर (2022)
पॅलेस्टिनी-इस्त्रायली लेखक-दिग्दर्शक महा हज यांचा मेडिटेरेरियन फीव्हर हा चित्रपट म्हणजे दोन मध्यमवयीन ‘फ्रेनीज’ बद्दलची ब्लॅक कॉमेडी आहे. कान चित्रपट महोत्सवाच्या अनसरटेन रिगार्ड स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार विजेता ठरलेला , हा चित्रपट एक महत्त्वाकांक्षी लेखक आणि एक यथातथा व्यक्ती यांच्यातील असंभव अशा भागीदारीभोवती विणलेला आहे.
6. व्हेन द वेव्हस आर गॉन (2022)
‘व्हेन द वेव्हस आर गॉन’ हा चित्रपट फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांच्या कथेवर आधारित असून ही कथा फिलीपिन्समधील गुन्हे अन्वेषण विभागातल्या अधिकाऱ्याच्या जीवनावर भाष्य करते. नैतिकतेच्या निर्णायक टप्प्यावर असलेला हा अधिकारी त्याच्या भूतकाळातील काही गोष्टीमुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेने त्रस्त आहे आणि तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला त्याच्या भूतकाळाची जाणीव सातत्याने करून दिली जाते.
लव्ह डियाझ, त्यांच्या स्वतःच्या अशा ‘सिनेमॅटिक टाईम’ शैलीसाठी ओळखले जातात (त्यांचा 2004 चा चित्रपट, इव्होल्यूशन ऑफ अ फिलिपिनो फॅमिली, जवळजवळ 11 तासांचा चित्रपट आहे ) या चित्रपटातील भाष्य उत्कृष्टरीत्या पडद्यावर उलगडण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
7. आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स (2022)
2022 च्या लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोस्टारिकन चित्रपट निर्मात्या व्हॅलेंटीना मौरेल यांनी ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात घटस्फोटित पालक, आपल्या दुरावलेल्या वडिलांबद्दल आपुलकी असलेल्या 16 वर्षांच्या इवा या मुलीची कथा आहे,जेव्हा ती त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला तिच्या वडिलांबद्दल आणि स्वतःबद्दल आश्चर्यकारक गोष्टी समजतात. या चित्रपटातील कामगिरीबद्दल लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रेनाल्डो अमीनला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि डॅनिएला मारिन नवारोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
8. कोल्ड ॲज मार्बल (2022)
पत्नीची हत्या केल्यानंतर तुरुंगात टाकलेल्या वडिलांच्या अनपेक्षितरित्या परतण्याबद्दलचा ‘कोल्ड ॲज मार्बल’ हा अझरबैजानचे दिग्दर्शक आसिफ रुस्तमोव्ह दिग्दर्शित चित्रपट, गुन्हेगारी -नाट्य /सायको-थरारपट आहे. हा चित्रपट एका तरुणावर केंद्रित आहे, ज्याला दिग्दर्शकाने बदलत्या समाजाचा विरोधी -नायक म्हणून दाखवले आहे. जेव्हा त्याला शेवटी कळते की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला का मारले तेव्हा .एक संवेदनशील चित्रकार आणि थडग्याचे खोदकाम करणारा करणाऱ्या या नायकाच्या आयुष्याला धक्का बसतो , हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
9. द लाईन (2022)
बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन बेअरसाठी नामांकन मिळालेला उर्सुला मेयरर्सच्या ‘द लाइन’ या चित्रपटात नात्यांचा स्वीकार आणि नाजूक कौटुंबिक बंधांचा व्यासंग मांडण्यात आला आहे. फ्रेंच-स्विस चित्रपट दिगदर्शकांचा हा चित्रपट आई आणि मुलगी यांच्यातील प्रक्षुब्ध नात्याचा शोध घेतो.स्वित्झर्लंडमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटतात मातृत्व आणि हिंसा या दोन्हींचे संयोजन पाहायला मिळते
10.सेव्हन डॉग्स (2021)
43 व्या कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झालेला , सेव्हन डॉग्स हा चित्रपट पैशासंदर्भात गंभीर अडचणींमधून जात असतानाही एका एकट्या राहणाऱ्या माणसाने आपल्या सात कुत्र्यांसाठी केलेल्या धडपडीबद्दलची कथा सांगतो. हा चित्रपट अर्जेंटिनियन दिग्दर्शक रॉड्रिगो ग्युरेरो यांचा चौथा चित्रपट आहे. फक्त 80 मिनिटांच्या या चित्रपटात , एक माणूस आणि त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत.
11. मारिया : द ओशन एंजेल (2022)
‘मारिया : द ओशन एंजेल’ हा चित्रपट ,समुद्रात एका सेक्स डॉलचा शोध लागल्यानंतर ज्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, अशा मच्छिमारांच्या समूहावर आधारित आहे. श्रीलंकन चित्रपट निर्मात्याआणि दिग्दर्शिका अरुणा जयवर्धना या त्यांच्या 2011 च्या ऑगस्ट ड्रिझल चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत.
‘मारिया: द ओशन एंजेल’ हा चित्रपट सुवर्णमयुर जिंकणारा दुसरा श्रीलंकन चित्रपट ठरावा अशी जयवर्धना यांची इच्छा आहे.
इफ्फीच्या 50 आवृत्त्यांच्या कालावधीत श्रीलंकेच्या लेस्टर जेम्स पेरीसच्या गॅम्पेरलिया या चित्रपटाने प्रथमच हा पुरस्कार जिंकला होता.
12. द कश्मीर फाइल्स (2022)
‘द कश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट 1990 च्या कश्मीरमधून झालेल्या कश्मिरी पंडितांच्या पलायनावर केंद्रित आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, या चित्रपटाची कथा , आपल्या पालकांच्या अकाली निधनाबद्दल सत्य शोधण्यासाठी निघालेल्या एका तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी या चित्रपटाचा नायक कृष्णाला मध्यवर्ती ठेवून बांधण्यात आली आहे.
13. नेझोह (2022)
2022 च्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पुरस्कार विजेता चित्रपट , नेझोह हा युद्धग्रस्त सीरियातील एका कुटुंबाविषयीचा चित्रपट आहे. सीरियाच्या वेढलेल्या भागात तिथेच राहणाऱ्या कुटुंबावर आधारित हा अरबी चित्रपट आहे. दिग्दर्शिका सौदे कादन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या शेजारी बॉम्बस्फोट झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी स्वतः घराबाहेरची परिस्थिती अनुभवली.
14. द स्टोरी टेलर (2022)
अनंत महादेवन यांचा ‘द स्टोरीटेलर’हा चित्रपट , थोर लेखक सत्यजित रे यांच्या तारिणी खुरो या पात्रावर आधारित आहे.तारिणी खुरो आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कथाकार होण्यासाठी एका विचित्र परिस्थितीत कसा सापडतो याची ही कथा आहे.2022 बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किम जी-सीओक पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले होते, तिथेच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.
15.कुरंगु पेडल (2022)
रसी अलगप्पन यांच्या ‘सायकल’ या लघुकथेवर आधारित, दिग्दर्शक कमलकन्नन यांचा कुरंगू पेडल हा चित्रपट एका शाळकरी मुलाला , त्याचे वडील त्याला शिकवण्यास असमर्थ असतानाही सायकल चालवायला शिकायचे आहे, याविषयीची कथा सांगतो.. ग्रामीण भागात घडणारी ही कथा पाच मुले पुढे नेतात . कमलकन्नन हे चित्रपट दिग्दर्शक त्यांच्या 2012 च्या मधुबानाकदाई चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत.