google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

यूकेतील श्रीमंतांच्या २०२५मधील यादीत
हिंदुजा कुटुंबाचे पहिले स्थान चौथ्या वर्षीही कायम…

सुमारे ११० वर्षांचा वारसा असलेल्या बहुराष्ट्रीय स्वरुपाच्या हिंदुजा उद्योग समुहाचे अध्यक्ष गोपिचंद हिंदुजा यांच्या नेतृत्वाखालील हिंदुजा कुटुंबाने ‘संडे टाइम्स रिच लिस्ट-२०२५’मध्ये ३५.३ अब्ज पौंड्स मालमत्तेसह चौथ्या वर्षीही पहिले स्थान कायम राखले आहे. ‘संडे टाइम्स रिच लिस्ट’ हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांचे वार्षिक मानांकन आहे. या यादीच्या २०२५च्या आवृत्तीमध्ये ३५० नावे आहेत. जागतिक अडचणी आणि धोरणात्मक बदल या आव्हानांवर मात करीत हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक सामर्थ्य आणि जागतिक नेतृत्व प्रदर्शित केले आहे.


ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या या कुटुंबाच्या मालकीच्या समुहातील कंपन्यांचे अध्यक्ष जी.पी. हिंदुजा आहेत. हा उद्योगसमूह ३८ देशांमध्ये कार्यरत असून वाहन निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग व आर्थिक सेवा, प्रसार माध्यम, प्रकल्प विकास, लुब्रिकंट्स व विशेष रसायने, ऊर्जा, रिअल इस्टेट, व्यापार आणि आरोग्यसेवा आदी क्षेत्रांमध्ये त्याची गुंतवणूक आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षभरात हिंदुजा समूहाने भारतात विद्युत वाहन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी समुहाने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. शाश्वत स्वरुपाच्या, भविष्यकालीन नवोन्मेषाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.


आपल्या व्यावसायिक साम्राज्याबाहेर हिंदुजा कुटुंबाने सामाजिक कार्यामध्येही आपले मोठे योगदान दिले आहे. हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जल संवर्धन या क्षेत्रांमध्ये परिवर्तनात्मक उपक्रम हा समूह राबवितो. याचा प्रभाव विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या समुदायांवर पडत आहे.


‘संडे टाइम्स रिच लिस्ट २०२५’मध्ये इतरही उल्लेखनीय नावे आहेत. डेव्हिड आणि सायमन रुबेन कुटुंब (२६.८७३ अब्ज पौंड्स), सर लिओनार्ड ब्लावातनिक (२५.७२५ अब्ज पौंड्स), सर जेम्स डायसन आणि कुटुंब (२०.८ अब्ज पौंड्स), इदन ओफेर (२०.१२१ अब्ज पौंड्स), गाय, जॉर्ज, आलनाह आणि गॅलन वेस्टन कुटुंब (१७.७४६ अब्ज पौंड्स), सर जिम रॅटक्लिफ (१७.०४६ अब्ज पौंड्स), आणि लक्ष्मी मित्तल कुटुंब (१५.४४४ अब्ज पौंड्स) यांचा यात समावेश आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!