पाकिस्तानचा भारतावर थरारक विजय
यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील आजचा (४ सप्टेंबर) भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. मात्र हा सामना अखेर पाकिस्तानने पाच गडी राखून जिकंला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ या जोडीने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचता आले. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुकांमुळेदेखील भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. अर्शदीप सिंगने सोडलेला झेल भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण बनला.
भारताने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम सलामीला आले. मात्र बाबर अवघ्या १४ धावा करून तंबूत परतला. रवी बिश्नोईने त्याचा बळी घेतला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला फखर जमानही चांगली कामगिरी करू शकला नाही. १५ धावांवर खेळत असताना त्याला युझवेंद्र चहलने झेलबाद केले. त्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाझ या जोडीने चोख भूमिका बजावली. रिझवानने ५१ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकार लगावत ७१ धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने २० चेंडूंमध्ये दोन चोकार, दोन षटकार लगावत ४२ धावा केल्या. तर खुशदील शाह (१४), असिफ अली (१६) या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं.
याआधी नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंत फलंदाजीसाठी आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मोठे फटके मारत अवघ्या २६ चेंडूंमध्ये भारतासाठी ५० धावा केल्या. मात्र दोघेही प्रत्येकी २८ धावा करून झेलबाद झाले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराट कोहलीने शानदार कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानावर फलंदाजी करत होता. त्याने ४४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ६० धावा केल्या.
सूर्यकुमार यादव (१३), ऋषभ पंत (१४) खास कामगिरी करू शकले नाहीत. हार्दिक पंड्या तर शून्यावर बाद झाला. शेवटी दीपक हुडाने १४ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. तसेच रवी बिश्नोईने दोन चेंडूंमध्ये आठ धावा केल्यामुळे भारताला २० षटकांमध्ये १८१ धावांपर्यंत मजल मारता आली.