देशातील पहिल्या खासगी ट्रेनचे बुकिंग सुरू
देशातील पहिल्या खासगी ट्रेनचे (First Private Train ) बुकिंग सुरू झाले असून, प्रवाशांना केरळ ते गोवा, मुंबई आणि अयोध्या असा प्रवास करता येणार आहे. चेन्नई-आधारित SRMPR ग्रुप आणि कोची-आधारित प्रिन्सी वर्ल्ड ट्रॅव्हल लिमिटेड ग्रुप टूर सुरु करणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या भारत गौरव योजनेंतर्गत 4 जूनपासून चार दिवसांच्या तिरुवनंतपुरम-गोवा टूर पॅकेजसह याची सुरूवात होणार आहे.
SRMPR ग्रुपने भारतीय रेल्वेकडून गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. केरळमधील कामकाज कोचीस्थित फर्मद्वारे व्यवस्थापित केले जात आहे.
एक व्यक्ती किंवा 600 प्रवाशांचा एक गट केरळमधून तीन प्रमुख गंतव्यस्थानांसाठी खाजगी ट्रेन प्रवास बुक करू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या 4 जून रोजी तिरुअनंतपुरम येथून गोव्यातील मडगावसाठी शुभारंभ ट्रेन रवाना होणार आहे.
असे असेल भाडं!
टियरनुसार भाडे 2-स्तरीय एसी 16,400 रुपये प्रति व्यक्ती, 3-स्तरीय एसी 15,150 रुपये प्रति व्यक्ती आणि नॉन-एसी स्लीपर प्रति व्यक्ती 13,999 रुपये भाडं असेल.
या पॅकेजमध्ये राहण्याची सोय, जेवण आणि प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ट्रेन प्रवास आणि संबंधित ऑनबोर्ड सुविधा तसेच ऑफ-बोर्ड प्रवास आणि बस, हॉटेल मुक्काम, टूर गाइड, जेवण आणि प्रवास विमा यासारख्या सेवा देखील प्रदान केल्या जातात.
प्रिन्सी वर्ल्ड ट्रॅव्हल लिमिटेडच्या संचालक देविका मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केरळ ते मुंबई आणि तिरुअनंतपुरम ते गोवा (चार दिवसांचे पॅकेज) आणि तिरुअनंतपुरम ते अयोध्या (आठ दिवसांचे पॅकेज) असे तीन टूर पॅकेज आहेत. सुरुवातीच्या तीन मार्गांनी जास्तीत जास्त लोकप्रियता प्राप्त केल्यानंतर नवीन मार्ग सुरू केले जातील.
या ट्रेन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात आहे. SRMPR ग्रुप खाजगीरित्या धावण्यासाठी जर्मनीतून विशेष गाड्या आयात करेल. या वर्षाच्या अखेरीस गाड्या येण्याची शक्यता आहे.