indvsnz World Cup 2023:
एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डॅरिल मिशेलच्या शतकानंतरही न्यूझीलंडचा संघ 48.4 षटकांत 10 विकेट्स गमावून 327 धावाच करु शकला.
भारताकडून मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारताने यापूर्वी 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, जिथे त्याने विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. यानंतर 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, तर 2019 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने उपांत्य फेरीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.