जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’ला विद्रूप करण्याचा प्रयत्न
पॅरिस:
चित्रकलेचा उत्तम नमुना असलेल्या जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगला एका अज्ञात व्यक्तीने केक लावून विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असू पेंटिंगला खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला ताब्यात घेण्यात आले आहे.
लिओनार्डो दा व्हिन्ची या महान चित्रकाराने मोनालिसा पेंटिंग साकारलेली आहे. ही पेंटिंग म्हणजे चित्रकलेचा सर्वोत्तम नमुना असल्याचे म्हटले जाते. सध्या ही पेंटिंग पॅरिसमधील लूव्रे या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. या पेंटिंगला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मात्र याच मोनालिसाच्या पेंटिंगला विद्रूप करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला आहे.
या व्यक्तीने वृद्ध महिलेचे रुप धारण करुन व्हिलचेअरवर संग्रहालयात प्रवेश केला होता. त्यानंतर मोनालिसा पेटिंगसमोर येताच हा माथेफिरू चेअरवरुन उठला आणि डोक्यावरचे विग काढत त्याने मोनालिसा या पेंटिंगला केक लावला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पेंटिंग पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.