इराणमधून ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
मागील काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरु होते. इराणमधील ‘संस्कृतीरक्षण पोलिसां’च्या मारहाणीत एक २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर इराणमधील महिला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’च्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. अखेर दोन महिने सुरु असलेल्या आंदोलनानंतर इराणचे सरकार झुकले आहे. इराणमधील ‘संस्कृतीरक्षक पोलीस’ हे युनिट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबत इराणचे अॅटर्नी जरनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी सांगितलं की, “संस्कृतीरक्षण पोलीस हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मात्र, हा निर्णय कायमस्वरुपी ही तात्पुरत्या स्वरूपासाठी घेण्यात आला आहे, याबद्दल माहिती दिली नाही.
हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’नी अटक केली होती. अटक केल्यावर प्रकृती खालावल्याने रुग्णालयात महसा हीचा मृत्यू झाला. महसाच्या मृत्यूनंतर ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’ची तिचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला पेटून उठल्या होत्या.
तर, महासाच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पण, इराणच्या सरकारने महसाशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाले नसल्याचे स्पष्ट केलं होतं. यानंतर महिलांनी आक्रमक होत हिजाब जाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. कलाकार आणि खेळाडूंनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.