मुंबई:
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून लिहिण्यात आलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा गुन्हेगार असल्याची जॅकलिनला आधीच माहिती होती, असा दावा ईडीने केला आहे. सुकेश हा खंडणीखोर (extortionist) आहे हेही तिला माहीत होतं. यामुळेच ईडीने जॅकलिनवर ताशेरे ओढले आहेत. जॅकलिनला याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नसली तरी तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
सुकेश चंद्रशेखरवर 215 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची सात कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचंही आरोपपत्रात उघड झालं आहे. सुकेशने पिंकी इराणीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.