फोंड्यात उद्या ‘नॉलेज टर्मिनस’चा ‘अकॅडमीक फोरम’
पणजी :
परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्या ‘अकॅडमीक फोरम’ची चौथी आवृत्ती शनिवार, ७ जानेवारी रोजी राजीव गांधी कला मंदीर, फोंडा येथे होणार आहे. गोवा राज्य सांस्कृतिक संचालनालय, क्रीडा आणि युवा व्यवहार खाते आणि राजीव गांधी कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून अनिवासी भारतीय आयोगाचे अध्यक्ष, माजी खासदार नरेंद्र सावइकर हे या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित आहेत. तर गोवा आयुर्वेदिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध रेडिओ जॉकी उदय चारी यांचे ‘जागतिक अभिव्यक्तीच्या शोधात’ या विषयावर बीजभाषण होईल. त्यानंतर विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील. यामध्ये सिने दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर हे कथनाचे तंत्र श्रीकांत गावडे हे कॅम्पेन आर्ट दीपराज सातारकर हे साहित्याचे अनुसर्जन आणि युगांत नायक हे लोकसंवादाचे तंत्र या विषयावर सत्र घेतील.
यानंतर रोहित खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ओपन फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होणार असून इच्छुक शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक संस्थांना knowledgeterminus@gmail.com या ईमेलवर नोंदणी करून उपस्थित राहता येणार आहे. एका संस्थेच्या वतीने तीन प्रतिनिधी नोंदणी करू शकतात असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.