… तर गोवा बनेल ‘देशातील सर्वात प्रदूषित राज्य’ : राजेश वेरेंकर
गोव्यातील विवीध आस्थापनांमध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (ETPs) आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स (STPs) ची कार्यप्रणाली कमजोर असल्याचे उघड करणाऱ्या गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अलीकडील अभ्यास अहवालावर प्रतिक्रिया देताना, राजेश वेरेंकर यांनी गोव्याला लवकरच आरोग्य आणि पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा दिला.
फोंडा येथे मलनिस्सारण प्रकल्पाचे भाजप सरकारने एका वर्षामागे उद्घाटन केले होते. परंतू, आजही सदर प्रकल्प कार्यांवित झालेला नाही. त्यामुळे सांडपाणी शेतात व नाल्यांत सोडण्यात येत असून, सभोवतालच्या विहिरी तसेच शेतजमिनी प्रदूषित झाल्याचे राजेश वेरेंकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने काही उद्योगांमधील एसटीपीचे डिझाइन अवैज्ञानीक आणि कमी क्षमतेचे असल्याचे समोर आले आहे. मडकई औद्योगिक वसाहतीत एका आस्थापनात 160 केएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेले ईटीपी आहे परंतु सदर आस्थापनात 170 केएलडी सांडपाणी निर्माण तयार होत असल्याने सदर अतिरिक्त घाण पाणि गावातील विहिरी आणि शेतात सोडले जाते, असा आरोप राजेश वेरेंकर यांनी केला.
घाऊक मासळी बाजार, फातोर्डा आणि शिरवडे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील ईटीपी क्लोरीनचा वापर जंतुनाशक म्हणून करत आहेत जे हानिकारक सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुचकामी असल्याचे सदर अहवालात नमूद करण्यात आल्याने सदर बाब चिंतेची आहे. गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळ गोव्यातील अनेक औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमुळे होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यात अपयशी ठरले आहे, असे राजेश वेरेंकर म्हणाले.
राज्यभरातील विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात सरकार अपयशी ठरल्याने फोंडा वासियांना गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे, असे राजेश वेरेंकर यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला जबाबदारीने आपले कर्तव्य बजावून आहे प्रदुषण नियंत्रणासाठी सक्रिय पावले उचलण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे राजेश वेरेंकर म्हणाले.