मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची असंवेदनशीलता उघड : मिशेल रिबेलो
मडगाव :
आत्मस्तुती आणि इव्हेंट साजरे करण्याच्या वेळी भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नियम आणि कायदे आणि सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची पर्वा करत नाहीत. रात्री 10 वाजता भाजप सरकार लग्न सोहळ्यातील संगीत थांबवतात पण मध्यरात्री 12 वाजता फटाके फोडतात. भारतीय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कारवाई करतील का?, असा सवाल काँग्रेस नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत फोंडा येथे मध्यरात्री फटाके फोडण्याच्या काही मीडिया चॅनलने पोस्ट केलेल्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
लग्न, वाढदिवस यांसारख्या कौटुंबिक कार्यक्रमात रात्री 10 वाजता वाजवले जाणारे संगीत बंद करून भाजप सरकार लोकांना त्रास देते. विरोधी पक्षांच्या कोपरा बैठका रात्री 10 वाजता थांबवणारा निवडणूक आयोग मध्यरात्री 12 वाजता फटाके फोडण्याची परवानगी कशी देऊ शकतो? असा सवाल मिशेल रिबेलो यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मध्यरात्री दारुकामाची आतषबाजी करण्यात आली हे धक्कादायक आहे. यावरून भाजपची सर्वसामान्यांप्रती असलेली असंवेदनशीलता दिसून येते. लोक झोपलेले असताना ते निवासी भागात फटाके कसे फोडू शकतात? आजूबाजूच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण असू शकतात. भाजपने त्यांची शांतता भंग केली, असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला.
मी डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढील वर्षात त्यांना समंजस आणि संवेदनशील बनवण्याची ईश्वराकडे प्रार्थना करते. परमेश्वराने मुख्यमंत्र्यांना आत्मस्तुती आणि इव्हेंट्सच्या ध्यासातून बाहेर आणू दे आणि सामान्य लोकांच्या दु:खाची जाणीव करून देवू दे, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.