मडगाव नगरपालिका स्वच्छता सेवा कामगारांना कायमस्वरूपी दर्जा द्या : मडगांवचो आवाज
मडगाव : दिंडी उत्सवाच्या पवित्र दिवशी, मडगाव शहरात भक्तीमय वातावरण असताना, मडगाव नगरपालीकेच्या रोजंदारी मजुरीवर असलेल्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांना काम बंद करावे लागले आणि निदर्शने करावी लागली. त्यांच्या करार कालावधीचे नूतनीकरण वेळेवर न होण्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला असून, अनेक मेहनती कुटुंबांना अनिश्चिततेचा सामना करावा लागला, अशी टीका मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.
“मडगाव नगरपालीका प्रशासनाने या कराराच्या मुदतीची पुर्वकल्पना असूनही अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली हे अत्यंत चिंताजनक आहे. रोजंदारी नेमणूकपत्र नूतनीकरण प्रक्रिया खूप आधीच सुरु करायला हवी होती. मडगाव पालिकेची कृती गेल्या दशकाहून अधिक काळ शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांविषयी उदासीनता आणि खराब नियोजन दर्शवते”, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
प्रभव नायक यांनी पुढे सांगितले, “जर मडगाव पालिका व्यवस्थापनाने नगरपालीका प्रशासन संचालनायाबरोबर नेमणूक प्रक्रिया सुरू केली आहे, तर ती प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे बाजूंनी आवश्यक होते. योग्य नूतनीकरण आदेशांशिवाय काम करण्यास सफाई कामगारांना काम करण्यास भाग पाडता येणार नाही. कोणताही मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा आमदार प्रशासनिक प्रक्रिया पूर्ण न करता व नेमणूक पत्र जारी न करता कामगारांना जबरदस्ती करू शकत नाही.”
प्रभव नायक यांनी असेही नमूद केले, “परत एकदा, मडगाव नगरपालीकेवर नियंत्रण असलेले मडगावचे पक्षबदलू आमदार व मंत्री दिगंबर कामत यांनी समर्पित रोजंदारी कामगारांना कायमस्वरूपी दर्जा देण्याचे दशकांपूर्वीचे वचन पाळले नसल्याचे उघड झाले आहे. अनेक कामगारांनी प्रामाणिकपणे रोजंदारी सेवेत असूनही अनेक वर्षे सेवा दिली आहे, तरीही ते नोकरीबद्दल सुरक्षिततेच्या अभावाचा आणि पालिकेच्या दुर्लक्षाचा सामना करत आहेत.”
मडगावचो आवाजचा रोजंदारी कामगारांना पूर्ण पाठिंबा असून, शासनाने तातडीने त्यांना कायमस्वरूपी रोजगार दर्जा देण्याची मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.


