
दिगंबर कामत यांची दुटप्पी भूमिका पुन्हा उघड : प्रभव नायक
मडगाव :
मडगावकरांसाठी खरी आणीबाणी ही भूतकाळातील नसून, सध्या आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा व्यक्तीकडून आहे जी केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जगते. आज गरज आहे केवळ एका माणसाविरोधात नव्हे, तर त्याच्याभोवती असलेल्या प्रॉक्सी ऑपरेटर, भांडवली दलाल आणि भ्रष्ट सत्तेच्या व्यवस्थेविरोधात उठून उभे राहण्याची. हा मडगावकरांसाठी खरा कसोटीचा काळ आहे. मडगावकर पुन्हा फसणार नाहीत, असे मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
२०२० मध्ये मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयांचे कौतुक करताना त्यांना ‘देशहिताचे निर्णय’ म्हटले होते आणि आता २०२५ मध्ये, हेच दिगंबर कामत त्यांच्यावर टीका करत आहेत. “ही दुटप्पी भाषा मडगांवकरांसाठी नवीन नाही – तोच कलाकार, फक्त नव्या संवादात,” असा चिमटा प्रभव नायक यांनी काढला.
कामत यांची राजकीय कारकीर्द म्हणजे संधीसाधूपणाचा उत्तम नमुना आहे. त्यांनी पक्षांतर केवळ एकदा नाही, दोनदा नाही, तर थेट तिसऱ्यांदा केलं आहे. “त्यांचा वारसा नेतृत्वाचा नाही, तर फसवणूक आणि सौदेबाजीचा आहे,” अशी घणाघाती टीका नायक यांनी केली.
“मी १९ नोव्हेंबर २०२० आणि ४ फेब्रुवारी २०२२ या तारखांचे व्हिडिओ माझ्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत दिगंबर कामत यांनी ज्या पक्षाला आणि नेत्यांना नंतर सोडून दिलं, त्यांच्यासमोरच निष्ठा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी ही निष्ठा त्याच “नातवाच्या” उपस्थितीत व्यक्त केली होती, ज्याचा त्यांनी काल उल्लेख केला आणि तो क्षण आज त्यांच्या ढोंगीपणाचं आरसाच ठरतो,” असे नायक म्हणाले. “तेव्हा त्यांनी स्वतःला तरुण पिढीचा ‘राजकीय आजोबा’ म्हटले आणि संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली. आज मात्र, त्यांनी ज्या पक्षाचा पूर्वी तीव्र विरोध केला होता, त्याच पक्षासोबत ते बिनधास्त उभे आहेत” असे प्रभव नायक यांनी सांगितले.
“या सातत्याने होणाऱ्या भूमिकांमधील बदलामुळे मतदारांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होतोच, शिवाय आपल्या संविधानाची पवित्रताही धुळीस मिळते. कामत यांचा विश्वासघात हा वैयक्तिक नाही, तो संस्थात्मक आहे. ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्या प्रत्येक मतदाराचा, कार्यकर्त्याचा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा त्यांनी विश्वासघात केला आहे,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.
मडगावचो आवाज या फसव्या राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहे. “दिगंबर कामत यांची राजकीय विश्वसनीयता केव्हाच संपली आहे. आता एकच तोडगा उरतो – मडगांवच्या जनतेने या अनुभवी पलट्याबाज आणि रंग बदलणाऱ्या राजकीय सरड्याला कायमचे निवृत्त करावे,” असा ठाम संदेश प्रभव नायक यांनी दिला.