राहुल-आदित्य यांची गळाभेट
मुंबई :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष सामील होत आहेत. गुरुवारी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड देखील या यात्रेत पोहोचले होते. आज शिवसेनेचे नेते आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे हे भारत जोडोमध्ये सामील झाले होते.
आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य यांची गळाभेट घेत, खुशाली विचारली. कधी आलात हे विचारले, तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूसही राहुल यांनी केल्याचं सुत्रांनी सांगितलं. गळाभेटीनंतर राहुल आणि आदित्य एकाच गाडीतून सभास्थळाकडे गेल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राहुल यांच्या भेटीनंतर आदित्य यांनी यात्रेतून निरोप घेतला. राहुल यांच्या या यात्रेमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाले, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.