
साताऱ्यातून? नको रे बाबा! रामराजेनी कोपरापासून जोडले हात
सातारा (महेश पवार) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि छ, खा. उदयनराजे भोसले या दोघांमध्ये राजकीय सौख्य कसे आणि कितपत आहे हे सर्वांनाच चांगलेच ठाऊक आहे. कदाचित यामुळेच साताऱ्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढणार का, पत्रकारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर लोकसभा साताऱ्यातून? नको रे बाबा असे म्हणत रामराजेंनी कोपरापासून दोन्ही हात जोडले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नुकत्याच झालेल्या वार्षिक आढावा बैठकीत रामराजे उपस्थित होते. .बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रामराजेंना आपण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढणार का असे विचारले. तेव्हा रामराजेंनी तात्काळ कोपरापासून दोन्ही हात जोडत साताऱ्यातून नको रे बाबा असे म्हणत इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाने संधी दिल्यास माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे रामराजे यांनी फलटण येथे झालेल्या एका कार्यक्रमात जाहीररित्या सांगितले. कोणत्याही परिस्थितीत यावेळेला वाड्यातीलच खासदार असेल असे ठामपणे सांगत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना घरी बसविण्याचा पक्का निर्धार केल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे परंतु ती साताऱ्यातून नव्हे तर माढा मतदारसंघातून असे सांगून रामराजेनी उदयनराजेंशी पंगा नको अन् जवळीक सुद्धा नको हेच जणू स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही रामराजेंना लोकसभेत पाठवण्याची आपली इच्छा असल्याचे जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखविले होते.