
…अखेर ‘कांतारा २’ला सुरुवात
२०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. जानेवारी महिन्यात ‘कांतारा’ने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले.
उगडी या कन्नड नववर्षानिमित्त होमबाले फिल्म्स आणि रिषभ शेट्टीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट दिला आहे. या पोस्टमधून त्यांनी ‘कांतारा २’च्या लिखाणाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी ते उत्सुक असल्याचं त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
मध्यंतरी ‘कांतारा २’बद्दल रिषभ शेट्टीने भाष्य केलं तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही आत्ता जे पाहिलं तो दूसरा भाग होता. या चित्रपटाचा प्रीक्वल म्हणजेच भाग १ पुढील वर्षी येणार आहे. कांताराचं चित्रीकरण करतानाच माझ्या डोक्यात याचा विचार आला होता, कारण या कथानकाचा इतिहास फार मोठा आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथानकासाठी अधिक मेहनत घेत आहोत. आत्ता याबद्दल जास्त सांगता येणं कठीण आहे.” रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.