
वनडे क्रिकेटमधल्या निवृत्तीबद्दल काय म्हणाला रोहित शर्मा?
Rohit Sharma Statement on ODI Retirement: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीच्या अफवांवर स्पष्ट उत्तर दिले आणि या अफवांवर पूर्णविराम लावला.
या स्पर्धेच्या आधी अशी चर्चा होती की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला निरोप देऊ शकतो. भारताच्या विजयानंतर, रोहितला सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याच्या भविष्याबाबत विचारण्यात आले. सुरुवातीला या स्टार फलंदाजाने हसून प्रश्न सोडला आणि पुढे म्हणाला, “भविष्यात काही वेगळे प्लॅन नाहीत, जे जसं आहे तसंच सुरूच राहणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्त होत नाहीये. मी हे सांगतोय जेणेकरून पुढे कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत.”
रोहितने अंतिम सामन्यात ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर काइल जेमिसनविरुद्ध त्याच्या ट्रेडमार्क पुल शॉट मारत एक मोठा षटकार खेचला. त्याने ४१ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले, जे आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील त्याचं पहिलंच अर्धशतक होतं.