‘एस .पी .साहेब आता तुम्हीच या वाहतूक विभागाकडे लक्ष घाला’
सातारा (महेश पवार) :
मुकी बिचारी कुणी हाका या उक्तीनुसार सध्या सातारच्या नागरिकांना ऑटो रिक्षा , जीप वाहनातून प्रवास करतांना त्रास सहन करावा लागत आहे. गेले पंधरा दिवस सातारा शहरात मनमानी कारभार सुरू असलेल्या रिक्षाव्यवसायिकांबाबत अनेक दैनिकांमधून वाचायला मिळत असतानाच रिक्षा स्टॉप सोडून रिक्षा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यात रिक्षा लावत करत वाटेल तेवढे भाडे आकारणे असे सुरू असताना त्यात कोणताच फरक पडत नाही असे दिसून येत आहे.
मात्र सध्या सातारा मुख्य बस स्थानकापासून राजवाडा परिसरातील बस स्थानकापर्यंत केल्या जाणाऱ्या शेअर रिक्षा वाहतुकीचा हा नवीन नवीन फंडा पाहायला मिळाला .
पत्रकार नात्याने नव्हे तर एक शेअर रिक्षातला प्रवासी म्हणून हा अजब प्रकार पाहिल्यावर मग कॅमेरा आणि लेखणी स्वस्त कशी बसणार ? त्यामुळे सोमवारच्या सकाळी बस स्थानक परिसरातून राजवाड्याकडे येताना शेअर रिक्षामध्ये नियमाप्रमाणे तीन प्रवासी घेणे योग्य असताना या महा भागांनी पुढे तीन आणि मागील सीट वरती अशी एकूण सहा प्रवासी घेऊन केलेली वाहतूक ही एखाद्या दुर्घटनेलाच आमंत्रण देणारी ठरणार नाही का असाच प्रश्न पुढे येत आहे.
सोबतच्या छायाचित्रात पाच प्रवासी दिसत असताना फोटो काढण्यासाठी मी थोडा मागे झुकलेला असा सहावा प्रवासी आहे. वस्तूतः 20 रुपये एका प्रवाशाला आकारून मागील काही महिन्यापूर्वी पेट्रोलची दरवाढ पुढे करत या कारणानुसार प्रवासीही अशा भाड्याला मान्यता देत ही शेअर पद्धतीची रिक्षा वाहतूक स्वीकारत आहेत .मात्र दमदाठीने आणि हम करे सो कायदा या म्हणण्यानुसार सध्या बस स्थानक परिसरात वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी असला काय आणि नसला काय या रिक्षा चालकांचे हे असे वर्तन बिनधास्त आणि खऱ्या अर्थाने मनमानी कारभाराचे ठरत आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत का सराईतपणे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असेच विचारावेसे वाटते कारण अशी जादा प्रवासी वाहतूक करताना पूर्वी रिक्षा खाजगी चालक शक्यतो मुख्य चौकातून वाहन न दामटता भीतीपोटी गल्लीबोळातून अशी वाहतूक करत होते. मात्र ही रिक्षा वाहतूक सहा प्रवासी माणसे घेऊन बिनधास्तपणे जिल्हा पोलीस मुख्यालय सातारा शहर पोलीस ठाण्यावरून निघूनही कोण काय करते अशाच मिजाशीमध्ये हा प्रकार सुरू असताना यावर आता जाब आणि न्याय कोणाला विचारायचा असा प्रश्न सामान्य सातारकरांना पडत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडे बहुदा नो पार्किंग मध्ये लावलेली वाहने उचलण्याशिवायआणि केवळ तेच महत्त्वाचे काम असे ग्राह्य मानून इतर प्रकारांकडे कानाडोळा आणि दुर्लक्ष होत असताना आता जिल्ह्याचे मुख्य अधिकारी या नात्याने स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांनीच अशा प्रकाराला लक्षात घेऊन यावर तातडीने कार्यवाही करत सामान्य सातारकरांना दिलासा द्यावा अशीच अपेक्षा वाटते.