अखेर शशिकांतरावांनी बांधली मांजराच्या गळ्यात घंटा!
सातारा (महेश पवार) :
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा गेल्या सहा- सात महिन्यांतील कारभार वादाच्या भोवर्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हेरिटेज झोनमध्ये कास महोत्सवाला दिलेली परवानगी, नेत्याच्या मागणीनंतर कास पर्यटकांसाठी नियोजित केलेलं पार्किंग झोनचं ठिकाण बदलणे, कास मार्गावरील अतिक्रमणांचा विषय, नियोजित मेडीकल कॉलेजच्या जागेतील भंगार चोरी, निधी वाटप आदी विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिका याविषयी उलटसुलट चर्चा याआधी ऐकायला येत होत्या. कास संदर्भात माध्यमांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर बोट ठेवलं होतं. ठराविक नेत्यांना धार्जिण असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी तर होती, पण बोलणार कोण असा प्रश्न अनेकांपुढे होता. अखेर आ. शशिकांत शिंदे यांनी पुढे येवून मांजराच्या गळ्यात घंटा बांधली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तथाकथित पक्षपाती कारभारावर आक्षेप घेतला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व नागरिकांचा निषेध लाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार असून अधिकारी कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, दुजाभाव कसा करतात हे स्पष्ट करून प्रशासनाचे पितळ उघडं पडणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार कुणाचेही असो प्रशासकीय अधिकाऱ्यांची वागणूक निपक्षपातीपणाची होती असा या जिल्ह्याचा आजवरचा अनुभव आहे. सध्या मात्र गेल्या सात महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील इतर प्रमुख अधिकारी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. निधी वाटपासह इतर कामांमध्ये दुजाभावाची वागणूक देवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा, कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात मोर्चा अनेक गंभीर बाबी चव्हाट्यावर मांडणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
सातारा – पंढरपूर मार्गावर सातारा ते कोरेगाव दरम्यानच्या कामासंदर्भात लोकांच्या अनेक तक्रारी असताना काही नेते आणि प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याच्या आरोप होतोय, उरमोडी धरण क्षेत्रातील अतिक्रमणे, बेकायदेशीर माती, मुरुम उत्खनन, मुरुम चोरी, औद्योगिक वसाहतीमध्ये माथाडी कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी, कास मार्गावरील अतिक्रमणे आदी विषय आणि प्रकरणांवर जिल्हा प्रशासनाची भूमिका स्पष्ट नाही हेच तक्रारींचा ओघ पाहता दिसून येतो.