‘…वेदनेतून साकारली ‘रेखा”
पणजी :
आजही आपल्या समाजात महिलांना आपल्या किमान हक्कांसाठी सातत्याने लढावे लागते. आणि महत्वाची बाब म्हणजे यात रस्त्याकडेला राहणाऱ्या बेघर महिलांपासून ते उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या समाजातील महिलापंर्यंत सगळ्याजणी एकाच पातळीवर आहेत. कोणत्याही महिलेला तिच्या स्वतःच्या जगण्यावर स्वतःचा अधिकार सांगता येत नाही. किमान शारीरधर्माबद्दलही, स्वच्छतेबद्दल त्यांना स्वतःचे असे काहीच म्हणणे नसते, हि बाब जास्त वेदनादायक आहे. ‘रेखा’ या वेदनेतून पडद्यावर साकारली आहे, असे प्रतिपादन ‘रेखा’ या बहुचर्चित आणि ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये निवडलेल्या लघुपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी सांगितले.
“रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी आपले दरवाजे बंद असतात. पण आपण हे का करतो? त्यांच्या दुर्दशेमागील कारण आणि रस्त्यावरील रहिवाशांची समाजाकडून होणारी अवहेलना, या प्रश्नांमुळे मी या प्रकल्पावर दीड वर्ष संशोधन केले.” रस्त्यावर राहणाऱ्या महिलांच्या जीवनातील अडचणी मांडतानाच हा चित्रपट त्यांच्या मासिक पाळी आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो. “या विषयावर संशोधन करत असताना, त्यांची प्रत्यक्ष स्थिती जाणून मला धक्का बसला. त्यांना अनेक महिने आंघोळ करायला मिळत नाही”, रणखांबे सांगत होते.
या माहितीपटातील कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील वग कलाकारांचा समावेश असून ते यापूर्वी कधीही कॅमेऱ्याला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे त्यांना कॅमेऱ्यांसमोरच्या अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची कार्यशाळा घेण्यात आली. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये संहितालेखन आणि चित्रीकरण झाले. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगलीचे रहिवासी आहेत.
चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या माया पवार आणि तमिना पवार यांनी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाल्याबद्दल आणि इफ्फीमध्ये सहभागाची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तमाशा कलाकार असले तरी सिनेमाच्या माध्यमाने अधिक ओळख मिळवून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छतेच्या संकल्पनेच्या विविध स्तरांवर झालेला विचार’
नायिका रेखा रस्त्याच्या कडेला राहते. त्वचेच्या बुरशीजन्य संसर्गाने ती ग्रस्त असते. डॉक्टर तिला आंघोळ करून औषध लावायला सांगतात. पण तिचा नवरा तिला अडवतो आणि तिच्याशी दुर्व्यवहार करतो. रेखा आंघोळ करण्यासाठी प्रयत्न करते पण जेव्हा तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे कारण सांगतात तेव्हा तिला धक्काच बसतो. स्वच्छ राहण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचे चित्रण यामध्ये आहे. हा चित्रपट स्वच्छतेच्या संकल्पनेच्या विविध स्तरांवर लक्ष केंद्रित करतो, तसेच समाजाने रस्त्यावर राहणाऱ्यांबाबत दृष्टिकोन बदलण्याची गरजही व्यक्त करतो. आपल्या समाजातील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.