सातारा
‘शिवतीर्थावर महाआरतीच्या नावानं वेगवेगळ्या चुली नेमक्या कशासाठी ?’
सातारा (महेश पवार) :
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातार्यातील शिवतीर्थावर मात्र यंदा शिवजयंती उत्सवात वेगळं चित्र दिसणार आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे ज्यांनी रयतेमधील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून सुराज्य निर्माण केलं, त्या छत्रपतींच्या सातार्यातील वारसदारांच्या नावाने असलेल्या मित्र मंडळांनी मात्र शिवतीर्थावर महाआरतीच्या नावानं वेगवेगळ्या चुली मांडण्याचे नियोजन करुन छत्रपतींच्या एकात्मतेच्या आदर्श विचारधारेची पायमल्ली करण्याचे नियोजन केल्याचे समोर येत आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
स्वराज्याची निर्मिती करताना ज्यांनी प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले, रयतेवर चालून आलेल्या बलाढ्य शक्तींना गारद करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जयंती उत्सवाच्या निमित्ताने एक नाही तर शेकडो महाआरत्या जरुर व्हाव्यात. पण त्या सर्वांनी एकत्र येवून एकसंघपणे कराव्यात. वेगवेगळ्या चुली मांडून कुणी महाआरतीच्या नावावर आमचे आराध्य दैवत छत्रपतींपुढे राजकीय ताकद दाखविणार असेल तर हा केवळ शिवप्रेमींचा नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणावा लागेल.
जयंतीदिनी छत्रपतींपुढे नतमस्तक होण्यापुरतं का होईना राजकारण बाजुला ठेवून एकत्र येणार नसाल तर छत्रपतींच्या एकीच्या विचारांची पायमल्ली त्यांच्याच पुतळ्यासमोर करण्याचं धाडस कुणीही न केलेलंच बरं. ऐतिहासिक राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याला क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. साताऱ्यातून शिवजयंती निमित्ताने देशभर चांगला संदेश जावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पवित्र शिवतीर्थावर छत्रपतींची एकत्र एकच महाआरती करावी, अशी तमाम शिवप्रेमींची अपेक्षा आहे.