google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे खाजगीकरण करणार नाही :  कॅप्ट. विरीयातो फर्नांडिस

मडगाव :

भाजप आता सार्वजनीक आरोग्य सेवा क्षेत्राचे खासगीकरण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडीया आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सरकारकडेच राहील आणि तेथे आयसीयू, कॅथ लॅब, न्यूरो सर्जरी युनिट त्वरित सुरू होईल   हे मी दक्षिण गोव्यातील जनतेला स्पष्टपणे सांगू  इच्छितो, असे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.


खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण करण्याच्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आरोग्य मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे येणाऱ्या काळात भाजप गरीब लोकांकडून मोफत आरोग्य सेवा हिसकावून घेणार आहे याची ही नांदी आहे अशी टीका भाजपवर केली.


दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा प्रकल्प  लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेसने सुरू केला होता. 2012 मध्ये सदर इस्पितळाचे  बांधकाम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले होते, परंतु उर्वरित 30 टक्के काम पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारला 8 वर्षे लागली, असा दावा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.

आज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात  कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे. हे रुग्णालय एक रेफरल हॉस्पिटल बनले आहे ज्यात रुग्णांना जीएमसी किंवा खाजगी रुग्णालयात पाठवले जाते, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नमूद केले.

सरकार कार्यक्रमांच्या आयोजनावर करोडो रुपये खर्च करत असताना सरकारला अत्यंत आवश्यक असलेले आयसीयू, कॅथ लॅब आणि न्यूरो सर्जरी युनिट का सुरू करता आले नाही, याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी द्यावे. भाजप सरकारने गेल्या 11 वर्षात गोव्यातील विविध कार्यक्रमांवर जवळपास 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत, असा दावा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आजचे वक्तव्य दक्षिण गोव्यासाठी धोक्याची घंटा आहे. दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास आरोग्य सेवा सुविधांचेही खाजगीकरण केले जाईल आणि प्रत्येक उपचारासाठी शुल्क आकारले जाईल, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

आपण सर्वांनी संघटित होऊन या गरीब विरोधी आणि श्रीमंत समर्थक भाजप सरकारला घरी पाठवूया. मी गोमंतकीयांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि काँग्रेसला मतदान करावे आणि भाजपचा पराभव करावा, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!