पुणे :
रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सर्वसाधारण सभेमध्ये तपन आचार्य यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी, मनोजकुमार यादव यांची उपाध्यक्षपदी तर प्रताप पगार यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
रोलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर कांत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोलबॉल फेडरेशनच्या 24 अंगीकृत राज्य संघटनेपैकी 20 राज्य संघटनेचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. यावेळी गोवा रोलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष तपन आचार्य यांची अध्यक्षपदी तर महाराष्ट्राच्या प्रताप पगार यांची सचिवपदी बहुमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीचा कार्यकाळ 4 वर्षांचा रहाणार आहे.
यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे यांच्यासह आंतरराष्ट्रीय रोलबॉलचे संचालक विनीत कुबेर, आशियाई रोलबॉल संघटनेचे सचिव डॉ. आनंद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीचे कामकाज अॅड. दिलीप हांडे, अॅड. अमोल काजळे पाटील व अॅड. अतुल बोबडे यांनी पाहिले.
नूतन अध्यक्ष तपन आचार्य निवडीनंतर म्हणाले, रोलबॉल हा भारतामध्ये लोकप्रिय होत असून, या खेळाचा अजून चांगल्या प्रकारे विकास व्हावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबरोबरीने हा खेळ ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करत राहू.
रोलबॉल फेडरेशनची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी :
अध्यक्ष : तपन आचार्य (गोवा), उपाध्यक्ष : मनोजकुमार यादव (झारखंड), चंद्रा मौली (आंध्र प्रदेश), अॅड. महिमा खजुरिया (जम्मू-काश्मीर), सचिव : प्रताप पगार (महाराष्ट्र), सहसचिव : एस. साजी (केरळ), गौरव डे (मेघालय), चित्रांजली नेगी (उत्तराखंड), खजिनदार : रणबीर सिंग (हरियाणा), सदस्य : बुमीधर बर्मन (आसाम), अर्चना कौर (छत्तीसगड), सायली उमराणीकर (पाँडेचेरी) व धर्मेश परमार (गुजरात).