
सातारा
ठोसेघर येथील बेकायदेशीर उत्खनन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
सातारा (महेश पवार) :
संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता पेयजल योजनेच्या कामासाठी ठोसेघर येथील रस्त्यावर उत्खनन करुन शासनाचे कोट्यवधीचे नुकसान ठेकेदाराने केले असल्याचे उघड झाल्यानंतर आता ठेकेदाराने प्रशासनाकडे मागच्या दाराअडून प्रकरण दडपण्यासाठीच्या हालचाली सुरु केल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम ही दोन्हीही प्रशासने आमचीच आहेत त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही, अशी भाषा करीत ठेकेदार बिनधास्त खुशीत गाजरे खातोय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप ग्रामस्थ करु लागलेत.
ठोसेघर, ता. सातारा येथे पेयजल योजनेचं कामाचा ठेका कागदोपत्री राहुलदेव कंन्स्ट्रक्शन श्रीगणेशा कॉलनी सातारा यांच्या नावे आहे. प्रत्यक्षात ठोसेघर येथील एका गाव पुढार्याने संबंधित प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याची साईडपट्टी तसेच वन विभागाच्या हद्दीत जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले. ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची तंतरली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला नोटीस धाडून हे काम तात्काळ थांबवा अशी सूचना केली. नोटीस मिळाल्यानंतरही जि. प. प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने ठेकेदाराने दांडगावा करीत काम सुरुच ठेवले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ठोसेघर गाठले व सुरु असलेलं काम रोखलं.
नियमबाह्य कामाचा पंचनामा केल्यानंतर सुमारे अडीच ते पावणे तीन किलो मीटर अंतर इतकी साईडपट्टी बेकायदेशीररित्या खोदून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे समोर आले. पैसे भरून ऑनलाईन परवानगी घेतल्याशिवाय काम सुरु करु नये अशी लेखी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला केली आहे. जिल्हा परिषदेत मागच्या दाराअडून हे प्रकरण दडपण्याच्या हालचाली ठेकेदाराने सुरु केल्या असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. प्रशासन आमचचं आहे, माझं काहीही होणार नाही असे म्हणत ठेकेदार खुशीत गाजरं खातोय. प्रशासनाने बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठिशी घालू नये, अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पंचायत समितीतून होतेय ठेकेदाराची पाठराखण
दरम्यान, पंचायत समितीमार्फत बाबर नावाच्या कर्मचार्याने या कामाचा सर्व्हे केला असल्याचे सांगण्यात येतयं. ठेकेदाराने एक तर या सर्व्हेनुसार खोदकाम न करता रस्ता खोदला असावा किंवा दुसरं म्हणजे सर्व्हे चुकीचा असावा. सर्व्हे चुकीचा नाही असे सांगत बाबर यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
दरम्यान, पंचायत समितीमार्फत बाबर नावाच्या कर्मचार्याने या कामाचा सर्व्हे केला असल्याचे सांगण्यात येतयं. ठेकेदाराने एक तर या सर्व्हेनुसार खोदकाम न करता रस्ता खोदला असावा किंवा दुसरं म्हणजे सर्व्हे चुकीचा असावा. सर्व्हे चुकीचा नाही असे सांगत बाबर यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.