तुर्कस्थान मध्ये भीषण भूकंप; २३०० जणांचा मृत्यू
Turkey Earthquake Update : मध्य टर्की तसेच उत्तर-पश्चिम सिरियामध्ये झालेल्या तीन भूकंपांमुळे येथे मोठी जीवितहानी झाली आहे. भूकंपामध्ये आतापर्यंत २३०० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अद्याप शेकडो लोक ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. याच कारणामुळे मृतांसह जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टर्कीमधील आपत्कालीन विभागाने या भूकंपांमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत अधिक माहिती दिली आहे. या माहितीनुसार टर्कीमध्ये झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आतापर्यंत १४९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिरियामध्ये आतापर्यंत ८१० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता २३०८ वर पोहोचला आहे.
सिरियामध्ये सोमवारी (६ फेब्रुवारी) पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर काही तासांच्या अंतरांवर आणखी दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या एकूण तीन भूकंपांमुळे टर्की देशातील महत्त्वाचे प्रदेश भुईसपाट झाले आहेत. टर्कीमधील राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी या दुर्घटनेला इतिहासातील सर्वांत मोठा आणि भीषण भूकंप असल्याचे म्हटले आहे.