
मडगाव : गोवा मनोरंजन सोसायटीचे प्रशासन अक्षरशः कोलमडले आहे. याचा प्रत्यय कोकणी चित्रपट “जुझे” ला माहिती व प्रसिद्धी खात्याच्या चित्रपट वित्त योजनेत “क वर्ग” देण्यात आला, यातून येतो. जुझे चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, जगभरातील अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सदर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गोवा मनोरंजन संस्थेने आपल्या संकेतस्थळावर जाहिर केलेली यादी गोमंतकीय प्रतिभेचा जाणीवपूर्वक छळ व गळचेपी करणारी आहे, असा गंभीर आरोप गोवा मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा अन्याय दूर करावा, एकंदर श्रेणी प्रक्रीयेत पारदर्शकता आणावी आणि प्रतिभावान गोमंतकीय कलाकारांना न्याय देवून योग्य ते पाठबळ द्यावे, अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली. जुझे चित्रपट दक्षिण गोव्याचे प्रतिभावान दिग्दर्शक मिरांशा नाईक यांनी दिग्दर्शित केला असल्याचे विशाल पै काकोडे यांनी सांगितले.
कोंकणी चित्रपट जुझे हा जगातील अव्वल समजल्या जाणाऱ्या कार्लोवी व्हेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अधिकृत निवड विभागात होता. या चित्रपटाने मिन्स्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार, इनोव्हेटिव्ह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक, तसेच सिंगापूर साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकले. या चित्रपटाचे हाँगकाँग, कॉर्क, डब्लिन, मुंबई, इफ्फी गोवा, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलसह २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत यशस्वी प्रदर्शन झाले. विशेष म्हणजे जुझे चित्रपटाने दहाव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात तब्बल १४ पुरस्कार पटकावले, ज्यातून त्याचा दर्जा व मान्यता अधोरेखित होते, असे विशाल पै काकोडे यांनी नमूद केले.
अशा ऐतिहासिक यशस्वी प्रवासानंतरही या चित्रपटाला चित्रपट वित्त योजनेत “क वर्ग” मध्ये घालण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक विसंगती व त्रुटी असून, ही वर्गवारी केवळ चित्रपट निर्मात्याचा अपमान नाही तर गोमंतकीय सर्जनशीलतेचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय यश साजरे करण्याऐवजी ईएसजी आणि माहिती-प्रसिद्धी खात्याने ते कमी लेखण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असे विशाल पै काकोडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांचा ‘पलतडचो मनीस’ हा चित्रपट गोवा सरकारने नाकारला होता. त्यानंतरची विडंबना म्हणजे तोच चित्रपट नंतर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने निर्मित केला. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवांत तो प्रदर्शित झाला. आता इतिहासाची पुनरावृत्ती होत असून, यातून प्रशासन बदलले तरी मानसिकता मात्र बदललेली नाही, हे स्पष्ट दिसते”, असे विशाल पै काकोडे यांनी सांगितले.
अशा दडपशाहीच्या कृतींमुळे गोमंतकीय चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. गोवा फिल्म फायनान्स योजना आज विसंगती आणि ढोंगी निकषांनी ग्रासलेली असून, ती खऱ्या अर्थाने पाठबळ देण्याऐवजी दुर्लक्ष व छळाचे साधन ठरली आहे, असा आरोप विशाल पै काकोडे यांनी केला.
गोवा फिल्म फायनान्स योजनेचे पूर्ण पुनरावलोकन होऊन, न्याय्य, पारदर्शक व गुणवत्ताधारित निकष लागू करणे ही काळाची गरज आहे. ईएसजी आणि माहिती-प्रसिद्धी विभाग हे राजकीय पक्षपातीपण व वैयक्तिक अजेंड्याचे साधन म्हणून काम करु शकत नाहीत. त्यांनी गोव्याच्या सांस्कृतिक व चित्रपट भविष्याचे खरे पुरस्कर्ते बनले पाहिजे. गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची गळचेपी केली जात आहे. मी याआधीही निदर्शनास आणून दिले आहे की, गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या तीन आवृत्त्या सरकारच्या वैध अधिसूचनेशिवाय आयोजित केल्या गेल्या, ज्यातून सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशासनाचा संपूर्ण ऱ्हास उघड होतो, असे विशाल पै काकोडे म्हणाले.