‘राजेंद्र सरकाळे यांचे एकूण कामकाज संशयास्पद…’
सातारा (महेश पवार) :
जिल्हा बँकेचा घोटाळा कुणाला माहित नाही, काहीतरी घोटाळा असल्याशिवाय इडीने बँकेला चौकशीचं पत्र पाठविलं का? इडीच्या पत्राबाबत बँक गप्प का, असा सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला. इडीच्या पत्राबाबत बँकेने उत्तर द्यायला पाहिजे. परंतु, बँक काही बोलायला तयार नाही. बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे समजून घ्या, असे वारंवार सांगत असल्याचा गौप्यस्फोट खा. उदयनराजेंनी केला.
धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या समवेत बैठक घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी सडेतोड भाष्य केलं. जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, जिल्हा बँकेचा घोटाळा कुणाला माहित नाही? काहीतरी घोटाळा असल्याशिवाय इडीने बँकेला चौकशीचं पत्र पाठविलं का? याबाबत अनेकदा विचारणा केल्यानंतरही बँक यावर काहीही बोलायला तयार नाही. केवळ बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे समजून घ्या, असे वारंवार म्हणत असल्याचा गौप्यस्फोट खा. उदयनराजेंनी केला. या लोकांविषयी काय बोलणार? बँकेचा अध्यक्ष, डायरेक्टर ही मोठी लोकं आहेत. या आधीचा बँक अध्यक्ष तर फारच मोठी व्यक्ती होती.
सीईओ राजेंद्र सरकाळे यांचा कारभार संशयास्पदच असल्याचे उदयनराजे यांनी परखडपणे मांडले. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सोसायटी घोटाळे याचबरोबर ईडीच्या बँकेला आलेल्या नोटिसीवर अत्यंत जवाबदारीने संचालक म्हणून भूमिका मांडताना महाराज म्हणाले ईडीची नोटीस येणें ही गंभीर बाब, त्यांच्या कारवाईला कायम ठोस आधार असतो. जिल्हा बँकेच्या पारदर्शी कारभाराचे ढोल वाजवणारे आजतागायत कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत.
राजेंद्र सरकाळे अप्रत्यक्षरित्या व्यक्ती केंद्रित कारभाराचे धनी असून बँकेतील संचालकांच्या अपुऱ्या ज्ञानाचा फायदा घेत संपूर्ण कारभार एकहाती पद्धतीने करताना कायम उडवाउडवीची उत्तरे देत , समजून घेण्याच्या गोष्टी करतात. त्यांना बँकेच्या बाबतीत मागितलेल्या प्रश्नांना बगल देत संचालक मंडळ, चेअरमन अशीच नावे पुढे करतात, असे खा. उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केले.