बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसक घटनेत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आज ( रविवारी) पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
याशिवाय काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
दरम्यान, या घटनेनंतर आता बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर भारत सरकारने बांगलादेशमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी केला आहे. बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास +88-01313076402 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी असलेल्या आरक्षणाची पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केले होते. यावेळीसुद्धा बांगलादेशमधील विविध भागात हिंसासाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आरक्षणासंदर्भातील सरकारचा निर्णय रद्द केला होता.