”म्हणून’ चिरेखाणीत बुडून होतोय नागरिकांचा मृत्यू’
मडगाव :
गोव्यातील चिरेखाणी आणि लोह खनिज खाणींच्या खड्ड्यांत बुडून तरुणांचा जीव गेल्याचे पाहणे खरोखरच वेदनादायी आहे. प्रतिबंधात्मक पाऊले उचलण्यात भाजप सरकारच्या अपयशामुळेच चिरेखाणीत व खाणपट्ट्यांत बुडून अनेकांचे प्राण गेलेत. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जुलै 2023 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सरकारने सार्वजनिक करावा तसेच खाण खात्याने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सरकारने जाहिर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोव्यात गेल्या काही महिन्यांत खाण खड्डे, चिरेखाणी, कालवे, धबधबे आणि समुद्रकिनारे यावर बुडून अनेकांचे मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या भाजप सरकारच्या अपयशावर ठपका ठेवला.
गोव्यात गेल्या काही वर्षांत खाण खड्डे, चिरेखाणी, कालवे आणि धबधबे येथे बुडून जवळपास 35 जणांचा जीव गेला. यामध्ये 2019 मध्ये तुवें येथील दगडखाणीत 4 निष्पाप मुलांचा मृत्यू, कुर्पे, सांगे येथील खाण खड्ड्यात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू आणि कांसावली येथे एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, रेवोडा, थिवीं येथे 21 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू तसेच नानोडा येथील 19 वर्षीय तरुणाचा झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. दु्र्देवाने त्याच नानोडा येथे मोहित कश्यप या 17 वर्षीय मुलाचा काल मृत्यू बुडून झाला, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
खाण खात्याने गेल्या वर्षी 30 जून 2023 रोजी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या दृष्टीकोनातून गोव्यातील खाण क्षेत्रांचे निरीक्षण आणि तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. कांसावली येथे पडीक खाण खंदकात एका विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, सदर घटनेची गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (जीएससीपीसीआर) स्वेच्छा दखल घेवून दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना सर्व खाणींचे सर्वेक्षण करून त्या कायदेशीर की बेकायदेशीर आहेत याची पडताळणी करण्यास सांगितले होते. तसेच दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना भविष्यातील मृत्यू टाळण्यासाठी काटेरी तारांचे कुंपण घालून खाणींमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
नद्या, धबधबे आणि कालवे इत्यादींवर पोहण्यास बंदी घालण्याच्या सूचना जारी करणे हा सरकारसाठी केवळ सोपस्कार झाला आहे. कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत भाजप सरकार गंभीर नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हे देखील चीरेखाणी आणि कालव्यांवर वारंवार बुडून मृत्यू होण्यामागचे कारण आहे. पर्यटक वारंवार भेट देत असलेल्या तलाव धबधब्यांवर जीवरक्षक तैनात करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या असंवेदनशील धोरणच गोव्यातील तरुणांचा जीव घेत आहे. इव्हेंट आयोजनाचे वेड लागलेले भाजप सरकार बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरले. सरकारने खाण खात्याने गठीत केलेल्या समितीचा अहवालही नागरिकांसमोर ठेवावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोमंतकीयांनी तसेच पर्यटकांनी सरकारवर विसंबून न राहता, समुद्र किनारे, धबधबे तसेच तलावांवर भेट देताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. सरकारला लोकांच्या जीवाचे पडलेले नाही हे स्पष्ट झाल्यानेच आता जनतेनेच आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.