‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सगळे विरोधी आमदार येणार एकत्र’
मडगाव :
आठव्या विधानसभेचे अठरा दिवस चालणारे पाचवे अधिवेशन विरोधकांना मुद्दे मांडण्याची आणि अपयशी, असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारचा पर्दाफाश करण्याची संधी देणार आहे. मला आशा आहे की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी न करता 18 दिवस विरोधी आमदारांना तोंड देण्याचे धैर्य दाखवेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोवा विधानसभा सचिवालयाने आज जारी केलेल्या समन्सवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सरकारला विरोधकांची भीती वाटत आहे आणि त्यामुळेच वेळापत्रक केवळ 18 दिवसांसाठी मर्यादित ठेवले आहे.
मुख्यमंत्र्यांचे इंग्रजी आद्याक्षरातील “मोगा” चे पूर्णरुप म्हणजे ‘मिनिमायझेशन ऑफ गोवा विधानसभा’ असे पूर्णरूप असणार नाही याची मी आशा बाळगतो. येत्या विधानसभा अधिवेशनाच्या सत्रात शेवटच्या आठवड्यात खाजगी सदस्यांचे कामकाज टाळण्यासाठी गुरुवारीच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी मी लवकरच सर्व विरोधी आमदारांची बैठक बोलावणार आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कृती योजना तयार करू असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
म्हादई, खाण व्यवसाय, पर्यावरणाचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था ढासळणे, इव्हेंट मॅनेजमेंटवर होणारा वायफळ खर्च, भ्रष्टाचार, समाजकल्याण खात्याच्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत न मिळणे, अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी करण्यात अपयश, आर्थिक मंदी, कोलमडलेला पर्यटन उद्योग आणि इतर विविध समस्यांवर आम्ही सरकारला जाब विचारू असे युरी आलेमाव म्हणाले.
आम्ही अधिवेशनातील सर्व कामकाजाच्या दिवसांचा इष्टतम वापर करून मुद्दे मांडू आणि सरकारला गोव्याच्या हितासाठी काम करण्यास भाग पाडू, असे युरी आलेमाव म्हणाले.