“कुंकळ्ळी आरोग्य केंद्र’ व ‘चांदर वारसा गांव’ घोषणांचे स्वागत’
पणजी:
माझ्या सहा प्रमुख प्रस्तावांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारून त्यांचा अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये समाविष्ट केल्याचा मला आनंद आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात अत्यंत आवश्यक असलेले आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या आणि चांदरला हेरिटेज व्हिलेजचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, या सर्व घोषणा प्रत्यक्षात येतील याची सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे.
कुंकळ्ळीला प्रगत अत्याधुनीक सुविधांसह आरोग्य केंद्राची गरज आहे. जाहिर केलेल्या आरोग्य केंद्राला अर्बन हेल्थ सेंटरचा दर्जा देण्याची मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. चांदरला हेरिटेज व्हिलेज म्हणून घोषित करण्याच्या घोषणेमुळे तेथिल समृद्ध वारसा घरांचे जतन होण्यास मदत होणार आहे. कुंकळ्ळीवासीयांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यापासून दिलासा देण्यासाठी भूमिगत केबल टाकण्याची गरज आहे, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील अवैधता, प्रदूषण आणि अतिक्रमणांना पूर्णविराम देण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मी हे मुद्दे सरकारकडे मांडेन आणि लवकरच त्यावरही तोडगा काढेन, असे युरी आलेमाव म्हणाले.
मी 9 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्र्यांना ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी केअर सेंटर निर्माण करण्याची मागणी करणारे एक पत्र लिहिले होते तसेच त्यांच्याकडे दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना आणण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी माझी मागणी मान्य केली आणि दक्षिण व उत्तर गोव्यात ऑटिझम इंटरव्हेंशन सेंटर्स उभारण्याची घोषणा केली व विशेष व्यक्तींच्या कल्याणासाठी खास खाते तयार करण्याचे जाहिर केले आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
गेल्या अधिवेशनातील माझ्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजभाषा विभागाच्या अर्थसंकल्पात 69.56 टक्क्यांनी वाढ करून 21.45 कोटी रुपयांची तरतूद केल्याचा मला आनंद आहे. हा पैसा कोकणीच्या संवर्धनासाठी वापरला जाईल अशी मी आशा बाळगतो, असे युरी आलेमाव म्हणाले.
मी खलाशासाठींच्या कल्याणकारी योजनेचा मुद्दाही उपस्थित केला होता आणि सरकारने कायमस्वरूपी खलाशी कल्याण योजना सुरू करण्याची मागणी केली होती. ही योजना कायमस्वरूपी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे मी स्वागत करतो आणि मला आशा आहे की लवकरच त्याची अधिसूचना जारी होईल, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.