पणजी :
भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रनेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन केले, पण त्यांची ‘आयडिया ऑफ इंडिया’ पुसून टाकण्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. राष्ट्राचे नेते राहुल गांधी हे सत्य, एकता, जातीय सलोखा आणि लोकशाहीचे कट्टर अनुयायी आहेत. भारताला एकसंघ आणि बलवान ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या महान नेत्यांचा वारसा ते पुढे चालवतात असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
इंडिया ब्लॉकच्या बॅनरखाली आझाद मैदानावर जमलेल्या निदर्शकाना संबोधित करताना युरी आलेमाव यांनी संसद सदस्यांना निलंबित करण्याच्या हुकूमशाही भाजप सरकारच्या कृतीचा निषेध केला. लोकशाही विरोधी आणि हुकूमशाही भाजप सरकारच्या विरोधात जाहिरपणे बोलल्याबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे आभार मानले.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, शिवसेनेचे जितेश कामत, तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी तनोज अडवलपालकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लोस फरेरा, एल्टन डिकोस्टा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदी आजच्या निदर्शनात सहभागी झाले होते.
भाजप सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करण्याच्या स्थानिक भाजपच्या कृत्याचा त्यांनी निषेध केला.
सुरक्षेचा भंग करून संसदेत प्रवेश करणाऱ्या दोन आरोपींना पासेस देणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी हळदोणेचे आमदार अॅड. कार्लोस फरेरा यांनी बोलताना केली. संसदेने काल मंजूर केलेल्या फौजदारी कायद्यातील सुधारणा ह्या घटनाबाह्य असल्याचेही ते म्हणाले.
एनसीपीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, इंडिया ब्लॉकच्या स्थापनेमुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी निवडणुकीत ही आघाडी भाजपचा पराभव करेल. टीएमसी पदाधिकारी तनोज अडवलपालकर यांनीही खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला आणि म्हटले की लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संयुक्त विरोधी पक्ष काम करेल. एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांचेही भाषण झाले.
सर्व नेत्यांनी इंडिया ब्लॉकसोबत एकता व्यक्त करण्यासाठी “हम होंगे कामयाब” गाणे गायले. एम.के. शेख यांनी सूत्रसंचालन केले. आंदोलकांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि संसद सदस्यांच्या निलंबनाचा निषेध करणारे फलक हातात घेतले होते.