‘कुंकळ्ळी बगल रस्ता साकारताना निवासी घरांचे रक्षण व्हावे’
मडगाव :
बायपासची कल्पना म्हणजे घरांचे नुकसान आणि नाश टाळणे आणि लोकांसाठी सुरक्षितता निर्माण करणे आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बगल रस्त्याच्या प्रस्तावित पर्याय-३ मुळे लोकांच्या घरांचे कोणतेही नुकसान होऊ नये, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
कुंकळ्ळी मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित बायपासमुळे घरे गमावण्याच्या भीती आणि चिंतेने, काही रहिवासी आज मला भेटले. १५ जुलै २०२२ रोजी विधानसभेतील मी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरानुसार गोवा सरकारने सदर बगल रस्त्यासाठी बाधित होणार्या घरांची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल असे स्पष्ट केले आहे अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
सदर तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात सदर बगल मार्गाची लांबी व अंतर, अंदाजे किंमत इत्यादी सदर सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे नमूद करण्यात आले आहे. कुंकळ्ळीचे रहिवासी आणि जमीन मालकांचे नुकसान होणार नाही यासाठी माझे प्रयत्न असतील. बगलमार्गाचा प्रस्तावित पर्याय-३ समजून घेण्यासाठी मी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बैठक घेणार आहे, असे युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.
कुंकळ्ळी बाजारात वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास हा उपाय आहे यात शंका नाही. बाजारपेठ आणि निवासी भागातून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. परंतु बगल मार्ग करताना निवासी घरे वाचवणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
ते म्हणाले की, घरे वाचवण्याच्या उद्देशाने सरकारकडे पर्यायी मार्गांचा प्रस्ताव यापुर्वी सादर झाला होता व तो मंजूरही करण्यात आला होता. कोकण रेल्वे मार्गाला समांतर जाणारा हा मार्ग अजूनही प्रादेशिक आराखडा -२१ मध्ये दाखविण्यात आला आहे याकडे विरोधी पक्षनेत्याने सरकारचे लक्ष ओढले आहे.
घरमालक तसेच रहिवाशांना दिलासा देणारा मार्ग बायपाससाठी निवडला जाईल याची जबाबदारी सार्वजनीक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे असे युरी आलेमाव म्हणाले.