
पणजी : कला आणि संस्कृती संचालनालयाने २०२५-२६ वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि युवा सृजन पुरस्कार जाहीर केले आहेत. संगीत, साहित्य, नाटक, तियात्र, भजन, लोककला, ललित कला आणि शिल्पकला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा कलावंतांचा यंदा गौरव करण्यात येणार आहे. राज्यातील कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांना विशेष महत्त्व मानले जाते.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी रजनी ठाकूर, आग्नेल जुवांव फर्नांडिस, रामचंद्र धोंडू नाईक (संगीत), गुरुदास एम. शिरगावकर (भजन), रमेश वंसकर आणि डॉ. जयंती नायक (साहित्य), ज्योती कुंकळयेकर आणि चंद्रकांत गावस (नाटक), आयरेन पिएदाद कार्डोज व दुर्मिंगो गॅब्रिएल कुरुन्हो (तियात्र), विनायक फडते आरखाईडकर (लोककला) तसेच महेश वेंगुळलेकर (ललित कला) यांची निवड करण्यात आली आहे.
युवा सृजन पुरस्कारासाठी सौरभ एम. कारखानीस आणि गोविंद साबाजी नाईक (नाटक), विशाल व्ही. गावडे (लोककला व हस्तकला), गौतम जी. गावस (भजन), दीपराज डी. सातर्डेकर (साहित्य) आणि उमाकांत टी. पोके (शिल्पकला) यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील कला आणि संस्कृती क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्याबरोबरच नवोदित प्रतिभांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. युवा सृजन पुरस्काराद्वारे उदयोन्मुख कलाकारांच्या कार्याची दखल घेतली जाते, तर राज्य सांस्कृतिक पुरस्कारांद्वारे विविध कलाक्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान केला जातो.
पुरस्कार वितरणाचा समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून, राज्यातील कला-संस्कृती क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.







