गोवा

कांपाल क्रीडा संकुलाच्या संभाव्य खासगीकरणावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी : विजय सरदेसाई

पणजी : कांपाल येथील सुमारे ३५ कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्याच्या हालचालींबाबत राज्य सरकारने पारदर्शक भूमिका मांडावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.


माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार कांपाल क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन खासगी ऑपरेटरकडे सोपविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे व्यवस्थापनही खासगी संस्थेकडे देण्यात आले होते. त्याच धर्तीवर कांपाल क्रीडा संकुलाबाबतही निर्णय होत असल्यास सरकारने त्याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.


“करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेली क्रीडा पायाभूत सुविधा ही मुलांचे, स्थानिक क्रीडा क्लबचे आणि उदयोन्मुख खेळाडूंचे हित जपण्यासाठी असावी; ती व्यावसायिक नफ्यासाठी वापरली जाऊ नये,” असे ते म्हणाले.



क्रीडा संकुलातील उपाहारगृह, सौरऊर्जा प्रकल्प यांसारख्या पूरक सेवांमध्ये खासगी सहभाग असू शकतो; मात्र मुख्य क्रीडा सुविधा सर्वसामान्य खेळाडूंसाठी परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध राहिल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


गोव्यातील डेम्पो स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग क्लब द गोवा यांसारख्या स्थानिक संस्थांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यासोबत भागीदारीचा विचार का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनंतर राज्यातील क्रीडा विकासाची सद्यस्थिती, पायाभूत सुविधांचा वापर आणि खेळाडू घडविण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.



क्रीडा धोरणाचे यश हे क्रीडा संकुलातून किती महसूल मिळाला यावर नव्हे, तर राज्यातून किती गुणवंत खेळाडू घडले यावर मोजले गेले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!