अर्थमत/ टेक्नॉलॉजी

अदानींकडून नवउद्योजकांसाठी ”वंदे भारतम्’

अहमदाबाद : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी त्यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी ‘वंदे भारतम्’ या राष्ट्रीय उपक्रमाचा शुभारंभ केला. देशभरातील नवोन्मेषक, उद्योजक आणि स्थानिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम देशातील सर्व ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच ८०० हून अधिक जिल्ह्यांपर्यंत पोहोचणार असून, विविध भारतीय भाषांमध्येही तो उपलब्ध असेल. वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय किंवा उपक्रमाच्या टप्प्याची कोणतीही अट नसून, नावीन्यपूर्ण कल्पना किंवा उद्योजकीय संकल्पना असलेली कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकणार आहे.

भारतात जगातील अग्रगण्य स्टार्ट-अप परिसंस्थांपैकी एक विकसित झाली असली, तरी ८० टक्क्यांहून अधिक स्टार्ट-अप संस्थापक केवळ पाच शहरांपुरते मर्यादित असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ग्रामीण भाग, लहान शहरे आणि नवोदित प्रदेशांतील उद्योजकांना आवश्यक ते मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि गुंतवणुकीच्या संधी मिळत नसल्याचे अदानी समूहाने नमूद केले आहे. ‘वंदे भारतम्’ उपक्रमाद्वारे ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान, उत्पादन, शाश्वत विकास, कृषी, पारंपरिक कला, सामाजिक नवकल्पना आदी विविध क्षेत्रांतील प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. महिला, आदिवासी, ग्रामीण भागातील नवोन्मेषक, दिव्यांग उद्योजक तसेच स्थानिक समस्यांवर उपाय सुचविणाऱ्या स्पर्धकांच्या सहभागाला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे.

प्राप्त अर्जांचे नावीन्य, सामाजिक परिणाम, विस्ताराची क्षमता आणि उद्योजकीय शक्यता या निकषांवर मूल्यमापन करण्यात येईल. राज्य आणि प्रादेशिक स्तरावरील निवडीनंतर अंतिम ७५ स्पर्धकांची अहमदाबाद येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निवड केली जाईल. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, गुंतवणूकदारांशी संवाद आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गौतम अदानी म्हणाले की, “मी माझा प्रवास सुरू केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आज जे काही मिळाले आहे, ते भारताच्या भूमीमुळेच मिळाले. देशात प्रतिभेची कमतरता नाही; मात्र संधी प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. ‘वंदे भारतम्’ हा अशा नवोन्मेषकांना शोधून त्यांना आवश्यक ते व्यासपीठ आणि पाठबळ देण्याचा प्रयत्न आहे.”

अंतिम फेरीतील स्पर्धकांना मार्गदर्शक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध सेवांची उपलब्धता करून देण्यात येणार असून, कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मदत दिली जाणार आहे. बक्षीस रक्कम आणि विविध पुरस्कारांची घोषणा पुढील टप्प्यात करण्यात येणार असल्याचेही समूहाने स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया २४ जूनपासून सुरू झाली असून इच्छुकांना vandebharatam.org या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ‘वंदे भारतम्’ हा उपक्रम भारतातील उद्योजकीय शोध आणि नवोपक्रमाला चालना देणाऱ्या व्यापक राष्ट्रीय व्यासपीठांपैकी एक ठरेल, असा विश्वास अदानी समूहाने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!