‘गोवा सुपर १००’ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा गौरव
पणजी : ‘पॅक्ट फाउंडेशन’च्या ‘गोवा सुपर १०० शिष्यवृत्ती’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नेरुळ येथील लक्ष्मी निलेश तोरसकर (बीए अर्थशास्त्र) आणि डाबळ येथील सात्विजा बाबलो नाईक (बीए एलएलबी) यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
या शिष्यवृत्तीअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सुमारे ₹३० लाखांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृह, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्चाचा समावेश आहे.
यावेळी पॅक्ट फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अश्विन फर्नांडिस यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. गुणवत्तेच्या आणि गरजेच्या आधारे वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी आर्थिक व निवासी सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.




