गोवा

आरजीपीमध्ये पुन्हा अंतर्गत संघर्ष; विरेश बोरकरांकडून कार्यकारिणी बरखास्त

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)मधील अंतर्गत सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी पक्षाच्या सरचिटणीस विशेष नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांना निलंबित केले आहे. तसेच राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक, वॉर्ड आणि इतर सर्व संघटनात्मक समित्या तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचा आदेशही त्यांनी जारी केला आहे.


पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मतभेदांमुळे पक्षात अंतर्गत संघर्ष तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर विरेश बोरकर यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेत संघटनात्मक फेररचनेची प्रक्रिया सुरू केल्याचे जाहीर केले आहे.


बोरकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सर्व विद्यमान समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, ४५ दिवसांच्या आत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.


दरम्यान, विशेष नाईक आणि अजय खोलकर यांच्यावर पक्षघटनेचे उल्लंघन आणि अनधिकृत कारवायांचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


यापूर्वी पक्षाच्या तत्कालीन कार्यकारिणीने विरेश बोरकर समर्थक १० पदाधिकाऱ्यांचे निलंबन जाहीर केले होते. मात्र, नव्या आदेशानुसार त्या निलंबनाचे आदेश मागे घेण्यात आले असून, संबंधित पदाधिकाऱ्यांवरील शिस्तभंगाच्या आरोपांची चौकशी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


निलंबन मागे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आदित्य देसाई, प्रेमानंद गावडे, विशाल गाऊस देसाई, प्रशांत पागी, राहुल नाईक, डँगले फर्नांडिस, मेल्विन दा सिल्वा, लिसिओ रँकॉन, मनीला शिरोडकर आणि संजन श्रीनिवास नाईक यांचा समावेश आहे.


आरजीपीतील या नव्या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!