
‘राम मंदिरातील देणगीचोरीतील दोषींना कठोर शिक्षा करा’
पणजी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पणजी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार (चंदा चोरी) प्रकरणातील दोषींना तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, श्रीराम मंदिरासाठी देशभरातील लाखो भाविकांनी श्रद्धेने देणग्या दिल्या आहेत. त्या विश्वासाला तडा जाणे अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

केजरीवाल यांनी या वेळी एका माजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांचा उल्लेख करत, त्यांनी श्रीराम मंदिराला एक किलो वजनाची सुवर्ण रामचरितमानस अर्पण केल्याचा दावा केला. ही सुवर्ण रामचरितमानस नंतर मंदिरातून गायब झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत संबंधित दात्याने विचारणा केल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अपमानास्पद उत्तर दिल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.





