
यंदाचा १५वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आशय, शैली आणि मांडणीचे वैविध्य अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांची समृद्ध मेजवानी घेऊन येत आहे. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पणजीत रंगणाऱ्या या महोत्सवात प्रस्थापित दिग्दर्शकांच्या चित्रपटांबरोबरच नव्या दमाच्या चित्रकर्त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या कलाकृतीही पाहायला मिळणार आहेत. सामाजिक वास्तव, कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंत, स्त्रीकेंद्री कथानक, प्रेम, ओळख, विनोद, रहस्य आणि थरार अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे चित्रपट यंदाच्या निवडीत आहेत. चार चित्रपटांचे जागतिक प्रीमियर आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत लक्ष वेधून घेतलेल्या कलाकृतींच्या समावेशामुळे ही निवड विशेष ठरते. महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या काही निवडक चित्रपटांचा हा थोडक्यात परिचय…
आकडा
वीजेसारखी मूलभूत सुविधाही न पोहोचलेल्या एका वस्तीतील पका आणि तारा या दाम्पत्याची ही कथा. विजेच्या खांबावर ‘आकडा’ टाकून जगणाऱ्या वस्तीत एका मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर पका कायदेशीर वीजजोडणी घेण्याचा निर्धार करतो. मात्र कागदपत्रे, पैसा आणि प्रशासकीय दिरंगाईच्या चक्रव्यूहात त्याची साधी मागणीही अशक्यप्राय बनते. व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेवर भाष्य करणारी ही सामान्य माणसाच्या संघर्षाची कथा आहे.
बाप्या
दहा वर्षांनंतर शैलजा लिंगपरिवर्तन करून डॉ. शैलेश पाटील म्हणून कोकणातील आपल्या गावी परतते. या अनपेक्षित पुनरागमनामुळे माजी पती आन्या, मुलगा संजू आणि गावकऱ्यांच्या भावविश्वात उलथापालथ होते. भूतकाळातील न बोललेली सत्ये समोर येताना नात्यांचे अर्थही नव्याने उलगडू लागतात. ओळख, कुटुंब, स्वीकार आणि बदल यांचा उबदार, विनोदी आणि संवेदनशील वेध घेणारा हा चित्रपट आहे.
भूतम् भयम्
सात बेरोजगार मित्र एका जुनाट, रहस्यमय वाड्यात राहायला जातात. तेथे सापडलेल्या ‘परीस’ नावाच्या गूढ नाण्याचा झटपट श्रीमंत होण्यासाठी प्लँचेटमध्ये वापर करताच एका प्राचीन शक्तीला जाग येते. त्यानंतर आत्मे, तांत्रिक आणि दडलेली रहस्ये त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतात. मैत्री, पुनर्जन्म, लोभ आणि नशिबाची सांगड घालणारी ही हॉरर-कॉमेडी आहे.
बोल बोल राणी
एका छोट्याशा गावात झालेल्या खुनामुळे गावातील वरकरणी शांत जग ढवळून निघते. गुन्ह्याचा शोध घेणाऱ्या तरुण पत्रकाराला माया आणि तिच्या कुटुंबापर्यंत नेणारा एक महत्त्वाचा धागा सापडतो. मात्र एकाच घटनेच्या तीन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी कहाण्या समोर येत गेल्याने सत्य अधिकच धूसर होते. कोणाचे कथन खरे आणि अंतिम सत्य नेमके काय, या प्रश्नाभोवती फिरणारी ही रहस्यकथा आहे.
फसक्लास दाभाडे
घरातील लग्नानिमित्त दोन वर्षांनंतर दाभाडे कुटुंब पुन्हा एकत्र येते. हशा आणि लग्नाच्या गडबडीसोबतच जुन्या मतभेदांना, दडपलेल्या भावनांना आणि नात्यांतील तणावालाही तोंड फुटते. या कौटुंबिक गोंधळातून प्रत्येकाला स्वतःकडे आणि परस्परांकडे नव्याने पाहावे लागते. कुटुंबातील प्रेम, आदर आणि एकोप्याचा अर्थ हलक्याफुलक्या पद्धतीने शोधणारे हे विनोदी नाट्य आहे.
गोंधळ
महाराष्ट्राच्या ग्रामीण सांस्कृतिक अवकाशात घडणारी ही परंपरा, महत्त्वाकांक्षा आणि मानवी असुरक्षिततेच्या संघर्षाची कथा आहे. उत्सवी विधी-समारंभांच्या पार्श्वभूमीवर नाती तुटू लागतात, निष्ठांची परीक्षा होते आणि दडलेली सत्ये हळूहळू समोर येतात. लोकपरंपरेतील प्रतीके आणि समकालीन सामाजिक-राजकीय वास्तव यांची सांगड कथेत घातली आहे. सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय थराराच्या अंगाने मानवी मनाचा वेध घेणारा हा चित्रपट आहे.
कैरी
लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी कावेरी पती आकाशसोबत लंडनला जाते. मात्र लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आकाश अचानक बेपत्ता होतो. त्याचा शोध घेताना प्रत्येक व्यक्तीकडून वेगळी माहिती मिळू लागते आणि आकाशच्या भूतकाळातील अनेक रहस्यांचे थर उलगडतात. नात्यातील विश्वास, फसवणूक आणि सत्याच्या शोधातील एका स्त्रीची जिद्द यांची सांगड घालणारा हा रहस्य-थरारपट आहे.

क्रांतीज्योती विद्यालय – मराठी मीडियम
नव्वद वर्षांची परंपरा असलेली ‘क्रांतीज्योती विद्यालय’ ही मराठी शाळा धोकादायक इमारत म्हणून पाडण्याच्या उंबरठ्यावर आहे. शाळा वाचवण्यासाठी ज्येष्ठ मुख्याध्यापक दिनकर शिर्के काही माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणतात. बालपणीच्या आठवणी जाग्या होत असतानाच बदलत्या शिक्षणव्यवस्थेचे वास्तव त्यांच्यासमोर उभे राहते. मराठी माध्यमाची शाळा वाचवण्याच्या संघर्षातून मातृभाषा, शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाबद्दल प्रश्न उपस्थित करणारा हा चित्रपट आहे.

मॅगझिन
शहरात वाढलेला आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा एक ‘जेन झी’ सिनेमाप्रेमी तरुण वडिलांच्या कोल्हापूरमधील गावी येतो. ऊसाची शेती, मातीचा गंध आणि गावातील संथ जीवनशैली त्याच्या शहरी जाणिवांना नवा संदर्भ देऊ लागते. कॅमेऱ्यातून जगाकडे पाहणारा हा तरुण हळूहळू कॅमेऱ्यापलीकडील जगाशी जोडला जातो. मुळांचा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध घेणारी ही तरुण मनाची कथा आहे.
मर्दिनी
सिंगल मदर अंजली आणि तिची मुलगी ओवी यांच्या छोट्याशा जगात एका अज्ञात सायबर गुन्हेगाराचा प्रवेश होतो. ऑनलाइन फसवणुकीतून सुरू झालेला संघर्ष अंजलीचे व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचतो. मुलगीही आपल्यापासून दुरावत असल्याचे जाणवल्यानंतर अंजली परिस्थितीपुढे झुकण्यास नकार देते. आधुनिक काळातील ‘महिषासुरा’विरुद्ध उभ्या राहणाऱ्या आईच्या लढ्याला दुर्गेच्या प्रतिमेशी जोडणारी ही थरारकथा आहे.

पांघरूण
स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रीच्या इच्छा आणि स्वातंत्र्यावर असलेल्या सामाजिक बंधनांच्या पार्श्वभूमीवर ‘पांघरूण’ची कथा उलगडते. पुरुषप्रधान व्यवस्थेत प्रेम, इच्छा आणि स्वतःचे आयुष्य निवडण्याचा अधिकार नाकारल्या गेलेल्या स्त्रीचे भावविश्व चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. बा. भ. बोरकर यांच्या लघुकथेपासून प्रेरित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. प्रेम, करुणा आणि प्रायश्चित्तासाठी केलेल्या त्यागाची ही शोकांतिका आहे.

पोर्ट्रेट
जुन्या ढंगाचा विक्षिप्त गुप्तहेर विनायक विचारे याच्याकडे शीतल आपल्या पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांचे पुरावे मिळवण्याची जबाबदारी सोपवते. गुप्त कॅमेऱ्यांतून समोर येणारे वास्तव मात्र तिच्या कथनापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. पुढे प्रत्येक नवे सत्य आधीच्या सत्यालाच संशयाच्या भोवऱ्यात ढकलते आणि विनायक स्वतःच या खेळातील प्यादे बनतो. फसवणूक, ब्लॅकमेल, लोभ आणि मानवी मनाच्या कपटी खेळावर आधारलेला हा गुंतागुंतीचा रहस्यपट आहे.

साबरबोंड
वडिलांच्या निधनानंतर दहा दिवसांचे सुतक पाळण्यासाठी मुंबईतील आनंद आईसोबत गावी येतो. नातेवाईकांकडून लग्नासाठी दबाव वाढत असताना तो बालपणीचा मित्र बाळ्यासोबत रानात वेळ घालवू लागतो. या सहवासात दोघांमधील मैत्री भावनिक आणि शारीरिक जवळिकीमध्ये बदलते. शहरात परतण्याची वेळ जवळ येत असताना या अनपेक्षितपणे फुललेल्या नात्याचे पुढे काय करायचे, हा प्रश्न आनंदसमोर उभा राहतो.

सकाळ तर होऊ द्या
विश्वासघात आणि आयुष्यातील अनेक आघातांमुळे अभय जगण्याची आशाच गमावून बसला आहे. आयुष्य संपवण्याच्या निर्णायक क्षणी त्याची भेट जीवनाकडे विलक्षण सकारात्मकतेने पाहणाऱ्या नियतीशी होते. एका रात्रीतील त्यांच्या संवादातून नियतीचे स्वतःचे वेदनादायी आयुष्यही उलगडत जाते आणि अभयला पुन्हा जगण्याची दिशा मिळते. दोन जखमी माणसांच्या क्षणभंगुर भेटीतून आशेचा शोध घेणारी ही भावकथा आहे.

स्नो फ्लॉवर
कोकणातील बाबल्या चांगल्या भविष्याच्या आशेने आई-वडिलांच्या विरोधात रशियाला जातो आणि तिथेच संसार थाटतो. मात्र एका दुर्घटनेत बाबल्या आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची मुलगी परी अनाथ होते. नातवंडाला मायदेशी आणण्यासाठी आजी-आजोबा दिग्या आणि नंदा रशियातील कायदेशीर व्यवस्थेशी झगडतात. प्रेम म्हणजे केवळ आपल्याजवळ ठेवणे की मुलाच्या भवितव्यासाठी त्याला मोकळे करणे, या भावनिक प्रश्नापर्यंत पोहोचणारी ही कथा आहे.

तिघी
मुंबईत नोकरी करणारी स्वाती आजारी आई हेमलताला भेटण्यासाठी अनेक वर्षांनंतर पुण्यातील माहेरी येते. तिथे आईची काळजी घेत राहिलेली धाकटी बहीण सारिका आणि स्वाती यांच्यातील जुन्या तक्रारी, राग आणि अपराधभाव पुन्हा उफाळून येतात. त्याचवेळी हेमलता आयुष्याचे अखेरचे दिवस आपल्या पद्धतीने जगण्याचा निर्णय मुलींना सांगते. एका जुन्या लग्नाच्या डीव्हीडीतून बाहेर पडणारे गुपित या तिघींच्या नात्याची समीकरणे पुन्हा बदलून टाकते.

तुला पाहता
पन्नास वर्षांपूर्वी सीमेवर लढण्यासाठी गेलेला हरी परत न आल्याने अरूचे आयुष्य वेगळ्या वाटेने जाते; मात्र दोघांचे पहिले प्रेम मनात कायम राहते. अर्धशतकानंतर अरू आणि निवृत्त मेजर जनरल हरी अनपेक्षितपणे पुन्हा समोरासमोर येतात. त्यांच्या भूतकाळातील गैरसमज आणि न सांगितलेले सत्य उलगडत असतानाच त्यांच्या नातवंडांचेही प्रेम या दोन कुटुंबांना जोडते. दोन पिढ्यांतील प्रेम, कुटुंब आणि स्वीकार यांची सांगड घालणारी ही अपूर्ण राहिलेल्या पहिल्या प्रेमाची कथा आहे.





