
प्रदेश काँग्रेस नेत्यांनी श्री दामोदरांचे घेतले दर्शन
मडगाव : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, नंदादीप राऊत, चिराग नाईक तसेच अन्य काँग्रेस नेत्यांसह आज श्री दामोदर मंदिराला भेट देऊन १२७व्या श्री दामोदर भजनी सप्ताहानिमित्त श्री दामोदरांचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी श्री दामोदरांच्या चरणी नतमस्तक होऊन गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाप्रती आपला आदर व श्रद्धा व्यक्त केली.
गोव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचा अविभाज्य भाग असलेल्या शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा या मूल्यांचे जतन करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या पवित्र प्रसंगी काँग्रेस नेत्यांनी गोवा आणि गोमंतकीय जनतेच्या सुख, शांती, समृद्धी व कल्याणासाठी श्री दामोदरांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख, समृद्ध वारसा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच जनतेची निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आवश्यक बळ, सद्बुद्धी आणि आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना केली.







