‘राष्ट्रीय सुरक्षा, सागरी रक्षणात गोवा पोलिसांचे योगदान मोलाचे’
पणजी : भौगोलिकदृष्ट्या गोवा राज्य लहान असले तरी देशाची अंतर्गत व राष्ट्रीय सुरक्षा तसेच सागरी किनारपट्टीच्या संरक्षणात गोवा पोलीस दलाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या सोहळ्यात गोवा पोलीस दलाला देशातील पोलीस दलांना दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला ‘प्रेसिडेंट्स कलर’ औपचारिकरीत्या प्रदान करण्यात आला.
या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
गोवा पोलिसांच्या आधुनिक कार्यपद्धतीचे कौतुक करताना अमित शहा यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या क्षेत्रात गोवा पोलीस आघाडीवर असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आपत्कालीन तक्रारींवर पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा वेळ पूर्वीच्या १८ मिनिटांवरून आठ मिनिटांवर आला आहे. हा वेळ आणखी कमी करून सहा मिनिटांवर आणण्याचे उद्दिष्ट गोवा पोलिसांनी ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीविरोधातील उपाययोजनांचाही शहा यांनी उल्लेख केला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘१९३०’ हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात गोवा पोलीस देशात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्याच्या कामगिरीतही गोवा पोलीस देशात आघाडीवर असल्याचा दावा त्यांनी केला.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईवर बोलताना गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. २०२९ पर्यंत गोवा ‘नशामुक्त’ करण्याच्या मोहिमेत गोवा पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटकांची सुरक्षा तसेच सागरी सीमांच्या संरक्षणात गोवा पोलिसांनी बजावलेली भूमिका आणि दाखवलेली तत्परता उल्लेखनीय असल्याचेही शहा यांनी नमूद केले.
गोव्यासाठी सुवर्णक्षण : सावंत
‘प्रेसिडेंट्स कलर’ मिळणे हा गोव्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. हा सन्मान मिळविणारे गोवा हे देशातील १५ वे राज्य ठरले आहे. हा केवळ गोवा पोलीस दलाचा नव्हे, तर संपूर्ण गोव्याचा सन्मान असल्याचे सावंत म्हणाले.
‘शौर्य, सुरक्षा आणि सेवा’ या ब्रीदवाक्याला अनुसरून गोवा पोलीस दल शिस्त, समर्पण आणि निष्ठेने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर असून आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचेही सावंत यांनी नमूद केले.





