
बार्देशच्या पायाभूत विकासाला गती देणार; मायकल लोबो
जीएसआयडीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रलंबित प्रकल्पांचा आढावा
पणजी : गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यावर भर दिला जात असल्याचे कळंगुटचे आमदार आणि जीएसआयडीसीचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी सांगितले. म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महामंडळाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून, प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे लोबो यांनी सांगितले. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते, पूल, आरोग्य केंद्रे आणि अन्य पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘बार्देश भवन’मुळे पार्किंगची समस्या कमी होण्याची अपेक्षा
म्हापसा-मरड येथे सुमारे ११० कोटी रुपये खर्चून ‘बार्देश भवन’ प्रशासकीय संकुल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या बहुमजली संकुलात सुमारे १९० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा प्रस्तावित आहे. म्हापसा शहरातील विविध सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणल्यास वाहतूक आणि पार्किंगवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा दावा लोबो यांनी केला. या प्रकल्पाचा प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्रकल्पांनाही प्राधान्य
जीएसआयडीसीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना चालना देण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. गरजेनुसार नवीन रस्ते, पूल आणि आरोग्य केंद्रे उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रादेवी येथील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव येथील आयुष रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, ते लवकरच संबंधित विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वास्कोसह राज्यातील सुमारे पाच प्रकल्प लोकार्पणासाठी तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
बोडगेश्वर रस्त्याचे रुंदीकरण
म्हापशातील बोडगेश्वर मंदिरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली. या कामामुळे म्हापशातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हापसा बसस्थानकाचे टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्याबाहेरील प्रकल्पांतून महसूल वाढवण्याचा प्रयत्न
जीएसआयडीसीची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी गोव्याबाहेरील राज्यांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निविदांमध्ये सहभागी होण्याचा विचार असल्याचे लोबो यांनी सांगितले. अशा प्रकल्पांतून मिळणारा अतिरिक्त महसूल गोव्यातील विकासकामांसाठी वापरण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाईल, असेही लोबो यांनी सांगितले.







